बालिकेवर अत्याचार ; एकास तीन वर्ष सक्तमजुरी
खेड :
एका गावातील बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रदीप बाळकृष्ण दळवी (रा. वाडीजैतापूर-खेड) या नराधमास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी शुक्रवारी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना जून 2017 मध्ये घडली होती. सरकार पक्षातर्फे अॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.
पीडित बालिका घरी जात असताना नराधमाने तिच्यावर हात टाकत लगतच्या झाडीझुडपात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिचा गळा दाबत ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती. या बाबत पीडितेच्या आई-वडिलांनी येथील पोलिसात दाखल केल्यानंतर नराधमास अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी झाली असता 7 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील जाडकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नराधमास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यामध्ये दंडाच्या रक्कमेचाही समावेश आहे.