हलशी-हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
नागरिकांत समाधानाचे वातावरण, महालक्ष्मी यात्रेला मिळणार सुकर मार्ग : यात्रेस 8 एप्रिलपासून होणार प्रारंभ
वार्ताहर/हलशी
हलशी-हलशीवाडी ते गुंडपी या महत्वाच्या मार्गाचे अखेर डांबरीकरण पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर झाला आहे. हलशी-हलशीवाडी येथे बुधवार दि. 8 रोजी होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे मानले जात होते.
तब्बल 28 वर्षांनंतर होत असलेल्या या भव्य यात्रेसाठी हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतुकीची सोय सुरळीत रहावी, यासाठी रस्त्याचे डांबरीकरण हे प्राधान्याचे काम होते. स्थानिक ग्रामस्थांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासन व संबंधित विभागानेही याची दखल घेत वेळेत काम पूर्ण केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नव्याने तयार झालेल्या रस्त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडथळ्dयाशिवाय मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार असल्याने या रस्त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यात्रेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण असून, सुधारित पायाभूत सुविधांमुळे यंदाची यात्रा अधिक भव्य आणि सुरळीत पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिकांना होणार मोठा लाभ
व्यापारी, लघुउद्योजक आणि स्थानिक विक्रेत्यांनाही याचा मोठा फायदा होणार असून परिसरात आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी निचरा व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना करण्याचीही मागणी केली आहे. जेणेकरून प्रवास आणखी सुरक्षित होईल. एकूणच, हलशी-हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने केवळ दैनंदिन प्रवासच सुलभ झाला नाही. तर महालक्ष्मी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनाही हा मार्ग भक्तांसाठी वरदान ठरणार आहे.