रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण
बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण अखेर बुधवारपासून सुरू झाले.बेळगाव रेल्वेस्टेशन रोड येथील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आता चकाचक झाला आहे. कॅन्टोन्मेंटमधील इतर काही रस्तेही लवकरच डांबरीकरण केले जाणार आहेत.दोन दिवसांपूर्वी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. अवघ्या दोनच दिवसात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मागील वर्षी पावसामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. तात्पुरत्या स्वरुपात दगड व माती टाकून डागडुजी करण्यात आली होती. परंतु, तरीदेखील पोस्टमन सर्कल येथे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण झाली होती. बुधवारी सकाळपासून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. गोगटे सर्कल ते रेल्वेस्टेशन मार्गावरचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे रेल्वेप्रवासी तसेच कॅन्टोन्मेंट बसस्थानकात ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता खड्ड्यांमधून प्रवास करावा लागणार नाही. उर्वरित रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे.