गणपत गल्ली रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
वर्दळीमुळे रात्रीच्या वेळी काम : व्यापाऱ्यांमधून समाधान
बेळगाव : नेहमीच वर्दळीच्या असलेल्या गणपत गल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. दिवसा या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने रात्रीच्या वेळी काम पूर्ण केले जात आहे. जुने डांबरीकरण उखडून या ठिकाणी नवे डांबरीकरण केले जात असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून गणपत गल्ली ओळखली जाते. खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये गर्दी असते. परंतु, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे व उखडलेला रस्ता यामुळे चालताना गैरसोय होत होती. काही ठिकाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे रस्ता खराब झाला होता. गणपत गल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर सोमवारी रात्री रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. जुने डांबरीकरण जेसीबीच्या साहाय्याने हटवून नव्याने डांबरीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाचनालयापासून कंबळी खुटापर्यंत एका बाजूचा रस्ता करण्यात आला. टप्प्याटप्प्याने दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून गुरुवारपर्यंत सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणपत गल्लीतील रस्ता चकाचक झाल्यामुळे व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.