For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भिक्षा’ मागा...प्रवेश मिळवा

06:22 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘भिक्षा’ मागा   प्रवेश मिळवा
Advertisement

कोणत्याही शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्यांना अनेक अटींची पूर्तता करावी लागते, हे सर्वांनाच माहीत आहे. कित्येकदा या अटी अत्यंत अवघडही असतात. त्या पूर्ण करणे कित्येकांसाठी अशक्य असते. अनेक शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या रकमेची डोनेशन्स घेतली जातात. तरीही आईवडील आपल्या पाल्यांचे भवितव्य सुरक्षित व्हावे, यासाठी कष्ट सोसून या अटी पूर्ण करतात.

Advertisement

मात्र, मध्यप्रदेशातील बुंदेलखंड भागात श्री गणेश संस्कृत विद्यालय नामक एक शिक्षण संस्था आहे, तेथे प्रवेश घेण्यासाठी अशा कोणताही अटी नाहीत. या संस्थेत हिंदू धर्माचे आणि पूजापाठाचे शिक्षण दिले जाते. विविध धार्मिक कृत्ये कशी करावीत याचेही शिक्षण येथे दिले जाते. या संस्थेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याला ‘भिक्षा’ मागावी लागते. भिक्षा मागणे या कृतीला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. ही कृती म्हणजे ‘भीक मागणे’ नसते. तर तिला एक धार्मिक महत्व आणि आधिष्ठान आहे. विद्यार्थीदशेत असताना पैसे किंवा संपत्ती यांचा मोह धरु नये असा धर्माचा नियम आहे. त्यामुळे विद्याभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भिक्षांदेहि करुन उदरनिर्वाह करावा आणि स्वत:चे लक्ष पूर्णपणे अभ्यासाकडे केंद्रीत करावे, हा या प्रथेचा मूळ हेतू आहे. पण काळाच्या ओघात जसे शिक्षणाचे स्वरुप भिन्न होत गेले, तशी ही भिक्षा मागण्याची प्रथा मागे पडली. श्री गणेश विद्यालयाने अशा मागे पडलेल्या प्रथा पुनरुज्जीवीत करुन त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे या शिक्षणसंस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांकेतिक पद्धतीने ‘भिक्षांदेहि’ करण्याची अट घालण्यात आली आहे.

भिक्षा मागण्याची अनेक विद्यार्थ्यांना लाज वाटते आणि तशी ती वाटणे हे स्वाभाविक आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातापित्यांकडेच भिक्षा मागण्यास सांगण्यात येते. तसे करण्यात विद्यार्थ्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. अशाप्रकारे पौरोहित्याचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेने काळाच्या ओघात नष्ट झालेल्या किंवा मागे पडलेल्या धार्मिक प्रथांचा प्रारंभ पुन्हा केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.