इराणमध्ये असीम मुनीर यांची फजिती
दौरा मध्येच रद्द करत मायदेशी परतण्याची वेळ
वृत्तसंस्था, तेहरान
पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना स्वत:च्या इराण दौऱ्याला मध्येच रद्द करत परतावे लागले आहे. इराणने असीम मुनीर यांना चांगलेच सुनावून रिकामी हाती परत पाठविले आहे. असीम मुनीर यांचा इराण आणि अमेरिकेमधील मतभेद कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरलेले नाहीत. इराणच्या नेत्यांनी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी स्वत:च्या अटी शिथिल करण्यास नकार दिला. मुनीर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे संदेशवाहक म्हणून इराणमध्ये पोहोचले होते.
असीम मुनीर उच्चस्तरीय चर्चेसाठी तेहरानमध्ये दाखल झाले होते, परंतु इराणमध्ये केवळ एक दिवस घालविल्यावरच त्यांना परतावे लागले आहे. तर त्यांचा दौरा हा 2 दिवसांचा होता. पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखाने स्वत:च्या दौऱ्यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इराणने याकरता होकार दिला नाही.
दौरा ठरला अपयशी
अमेरिका आणि इराणदरम्यान मध्यस्थीचे पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मुनीर यांचा हा दौरा त्या प्रयत्नांच्या अपयशानंतर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा एक प्रयत्न मानला जात होता. मुनीर हे स्वत:सोबत ‘खास आणि गोपनीय’ प्रस्ताव घेऊन गेले होते, ज्याचा उद्देश तणाव कमी करण्यासाठीचा मार्ग शोधणे होता. परंतु इराणच्या नेत्यांनी प्रस्ताव फेटाळत अमेरिकेने मागण्या पूर्ण केल्या तरच करार होणार असल्याचे सुनावले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी प्रकरणी स्वत:च्या जुन्या भूमिकेवर इराण ठाम आहे. याचमुळे पाकिस्तानच्या प्रयत्नानंतरही इराणच्या भूमिकेत कुठलाच बदल झालेला नाही.
तेहरान टाइमच्या कव्हर स्टोरीने संदेश
मुनीर यांनी स्वत:च्या दौऱ्यादरम्यान इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी चर्चा केली. परंतु इराणच्या सर्वोच्च नेत्यासोबत बैठक न होणे त्यांची फजिती करणारे ठरले. इराणमध्ये रणनीतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय अखेर देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनच घेतले जातात. याचबरोबर तेहरान टाइम्सच्या मुख्य पानावर प्रसिद्ध एका वृत्त अहवालात मुनीर यांच्या दौऱ्याला वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आले. यात मुनीर आणि पेजेश्कियान यांच्या भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्याला ‘गॅम्बलरचा डाव’ असे शीर्षक देण्यात आले होते. तसेच ट्रम्प इराणविरोधात आर्थिक युद्ध चालवत असताना मुनीर यांना या संघर्षातून ‘सन्मानाने बाहेर पडण्याचा मार्ग’ शोधण्यासाठी पाठविले जात असल्याचे यात म्हटले गेले आहे.