आशियाई सिंहांचा वावर दीवमध्ये
सध्या गुजरात राज्यातील मोरबी आणि द्वारका वगळता सौराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या काही काळापासून आशियाई सिंहांनी आपणहून स्थलांतर केल्याच्या घटना प्रकाशात आलेल्या आहेत. जुनागड, अमरेली, जामनगर, बोताड, अहमदाबाद, पोरबंदर, गीर-सोमनाथ, राजकोट, भावनगर आणि सुरेंद्रनगर या जिल्ह्यांबरोबर आशियाई सिंह सध्या दीव या केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करून वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकेकाळी गोवा, दमणबरोबर दीव एका छत्राखाली केंद्रशासित प्रदेश होता. सागर किनारा आणि पोर्तुगीजांची जुनी वसाहत म्हणून पर्यटकांचे आकर्षण ठरलेले दीव आज सिंहांच्या आगमनामुळे चर्चेत आलेले आहे.
आशियाई सिंह या मांसभक्षक जंगली प्राण्यांसाठी भारतातल्या गुजरात राज्यातील गीर हे महत्त्वाचे आश्रयस्थान ठरलेले आहे. एकेकाळी जगातल्या बऱ्याच भागात आढळणारे सिंह दक्षिण आफ्रिकेतील सहारा व भारतातील गीर येथील नैसर्गिक अधिवासात वावरतात. एकोणिसाव्या शतकापर्यंत जंगली सिंहांचे अस्तित्व पश्चिम युरोप, इराण, टर्कीपासून भारतातील नर्मदा नदीखोऱ्यातल्या प्रदेशात आणि पश्चिम बंगालपर्यंत होते. उत्तर आफ्रिकेतील सिंह आणि आशियाई सिंह यांच्यात शारीरिक व जनुकीय साम्य आढळल्याने 2017 साली या दोन्ही ठिकाणच्या सिंहांची प्रजाती पँथेरालिओ अशी नोंद झालेली आहे. आज सिंहांचा नैसर्गिक अधिवास मर्यादित असल्याकारणाने ‘आययुसीएन’ संस्थेने ‘अस्तित्व धोक्यात असलेल्या’ प्राण्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे. वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्ण काळात भारतातील राजे, सरदारांचा छंद असल्याने त्यांची संख्या वीसवर पोहोचली. त्याची दखल घेऊन जुनागड आणि रसुलखंजी येथील नवाबांनी त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न आरंभले होते. भारत सरकारने सिंहांची खालावत जाणारी संख्या ध्यानात घेऊन 1965 साली 258 किलोमीटर क्षेत्रफळात गीर अभयारण्याची निर्मिती केली तर 1975 साली अभयारण्यातल्या 141 किलोमीटर क्षेत्रफळाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला.
भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या प्रयत्नाने 2015 साली सिंहांची संख्या 523 वरती तर 2020 साली 674 सिंह जंगलात असल्याची नोंद झाली. आज भारतात गीर हे एकमेव सिंहांचा नैसर्गिक अधिवास असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने आशियाई सिंहांची वाढती संख्या आणि त्यांचे वर्तमान आणि भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्वसन मध्य प्रदेशातल्या कुनो पालपूरच्या जंगलात करण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे परंतु गुजरात सरकारचा या योजनेला पाठिंबा नसल्याने सिंहांच्या पुनर्वसनाची योजना सध्या शीतपेटीत आहे. एखाद्या साथीच्या रोगाने गीर येथील सिंहांची संख्या संकटग्रस्त झाली तर कुनो पालपूरच्या पुनर्निवासाच्या योजनेद्वारे सिंहांसाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास लाभेल, असा वन खात्याला आशावाद आहे आणि त्यासाठी ही योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. सिंह प्राण्याचा नैसर्गिक अधिवास गीरमध्ये असल्याकारणाने गुजरात सरकारने सिंहाला आपल्या राज्याचे मानचिन्ह मानून त्याची सांगड अस्मितेशी जोडलेली आहे. गीरमध्ये वन खात्याने ज्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना राबविलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची संख्या विस्तारत चाललेली आहे परंतु असे असले तरी मानव आणि सिंह यांच्यातला संघर्ष हा धोक्याच्या वळणावरती पोहोचलेला असल्याकारणाने गेल्या दोन वर्षात बरेच सिंह मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटना समोर आलेल्या असून पाळीव जनावरांचा फडशा सिंहांनी पाडलेला आहे.
नैसर्गिक अधिवासाबरोबर खाद्यान्न, पाण्यासाठी सिंहांचा संघर्ष परिसरातल्या मानवी समाजाबरोबरही वाढतच चाललेल्या असल्याकारणानेच मध्य प्रदेशातील कुनो पालपूरच्या जंगलात त्यांच्यासाठी पुनर्निवास प्रस्थापित करण्याची योजना आखली होती परंतु ती प्रत्यक्षात न आल्याकारणाने गीर येथील सिंहांनी अन्न, पाणी आणि अधिवासाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने गीर परिसरातल्या बऱ्याच ठिकाणी स्थलांतर केल्याची बाब प्रकाशात आलेली आहे. सध्या गुजरात राज्यातील मोरबी आणि द्वारका वगळता सौराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या काही काळापासून आशियाई सिंहांनी आपणहून स्थलांतर केल्याच्या घटना प्रकाशात आलेल्या आहेत. जुनागड, अमरेली, जामनगर, बोताड, अहमदाबाद, पोरबंदर, गीर-सोमनाथ, राजकोट, भावनगर आणि सुरेंद्रनगर या जिल्ह्यांबरोबर आशियाई सिंह सध्या दीव या केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करून वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकेकाळी गोवा, दमणबरोबर दीव एका छत्राखाली केंद्रशासित प्रदेश होता. सागर किनारा आणि पोर्तुगीजांची जुनी वसाहत म्हणून पर्यटकांचे आकर्षण ठरलेले दीव आज सिंहांच्या आगमनामुळे चर्चेत आलेले आहे.
पर्यावरणीय परिसंस्थेबरोबर नैसर्गिक अधिवासात होणारे परिवर्तन यामुळे आशियाई सिंहांनी आपल्या परिक्षेत्रातून दीवमध्ये स्थलांतर केलेले आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, मानवी समाजाचा वन्यजीवांच्या अधिवासात होणारा वाढता हस्तक्षेप आणि अतिक्रमण यामुळे निसर्गातला समतोल ढळू लागलेला आहे. त्यामुळे सिंहासारख्या मांसाहारी जंगली प्राण्याला नव्या अधिवासाची शोध घेण्याची गरज निर्माण झाल्याकारणाने त्यांनी दीवमध्ये स्थलांतर केल्याचे स्पष्ट झालेले आहे. गीरच्या जंगलात आशियाई सिंहांची वाढती संख्या आणि त्यामुळे अपुरा ठरणारा नैसर्गिक अधिवास यामुळेच दीवमध्ये स्थलांतर करण्याला बहुधा प्राधान्य दिलेले असावे. नैसर्गिक अधिवासात त्यांच्या भरण-पोषणाबरोबर वावर करण्यासाठी पोषक वातावरण प्रदीर्घ काळ निर्माण करण्याची ठोस योजना आशियाई सिंहांच्या पैदासीसाठी अत्यावश्यक ठरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आशियाई सिंह दीवमध्ये आल्याने गुजरात सरकारच्या वनखात्याने दोन नरांना फेब्रुवारी 10 रोजी पकडून त्यांच्या अधिवासात मुक्तता केली. खरेतर दीवमध्ये सिंहाचे आगमन ही नवी बाब नसून यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये एका मादीसह चार निम्न प्रौढ सिंह दीवातल्या धनगरवाडीत संचार करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. या सिंहांनी धनगरवाडीतल्या पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केल्याने पशुपालकांत भीती निर्माण झाली होती.
गीरच्या जंगलातून या सिंहांच्या चमूने ओहोटीच्यावेळी किंवा खाडीतल्या पाण्यातून पोहून दीवमध्ये प्रवेश केल्याचे मानले जाते. दीवच्या तुलशीश्याम आणि उना या 50 कि.मी.च्या परिघात सिंहांचा वावर वाढलेला आहे. नागोवा, वनकबारा आणि दीवातल्या अन्य भागांतही सिंहाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गीर-सोमनाथ आणि अमरेली उत्तरेला आणि अन्य तिन्ही दिशांना दीवची भूमी अरबी सागराने व्यापलेली असून इथल्या सागरकिनाऱ्यांच्या सौंदर्यासाठी पर्यटकांत त्याची ख्याती वाढलेली आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून आशियाई सिंहांसोबत गुजरातमधील मालधारी समाजाने गीरच्या जंगलात वास्तव्य सौहार्दपूर्णतेने केले होते. कधीकाळी गीरच्या जंगल प्रदेशापासून जाफराबादपर्यंत जे विखुरलेले वनक्षेत्र आहे, तो सिंहांचा भ्रमणमार्ग असून त्या पट्ट्यात त्यांचे वास्तव्य आणि पैदासी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. गीरच्या जंगलात अस्तित्वात असलेला नैसर्गिक अधिवास अपुरा पडत असल्याने आणि तेथे मानव-सिंह यांच्यातल्या संघर्षाला नवीन घुमारे फुटू लागल्याने सिंहांनी जणूकाही आपणहून दीवसारख्या प्रदेशात प्रवेश केलेला असावा. गुजरात राज्याच्या गीरच्या जंगलातच त्यांचा नैसर्गिक अधिवास सीमित करण्याच्या मानवी प्रयत्नांच्या अदम्य इच्छा-आकांक्षेला तडा देऊन सिंहांनी दीवच्या जंगलात आपला मोर्चा वळविलेला आहे, ही बाब लक्षणीय अशीच आहे.
- राजेंद्र पां. केरकर