आशियाई यू-15, यू-17 मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप आजपासून
वृत्तसंस्था, ताश्कंद (उझ्बेक)
2026 च्या आशिया मुष्टियुद्ध विविध वयोगटातील चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 15 आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या विभागात घेतली जात आहे. या स्पर्धेत भारताचा 56 सदस्यांचा संघ सहभागी झाला आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या मुले आणि मुलींच्या विभागातील 15 व 17 वर्षांखालील वयोगटातील दर्जेदार युवा मुष्टियोद्ध्यांना संधी देण्यात आली आहे. 17 वर्षांखालील वयोगटात मुले आणि मुलींच्या विभागात प्रत्येकी 13 सदस्यांचा समावेश आहे. ही स्पर्धा 44-46 ते 80 किलोवरील अशा विविध वजन गटामध्ये घेतली जाणार आहे. 15 वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या विभागात प्रत्येकी 15 मुष्टियोद्धांचा भारतीय संघात समावेश आहे. सदर स्पर्धा 30-33 ते 70 किलोवरील विविध वजन गटात होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघासमवेत 4 प्रशिक्षक आणि फिजिओंचा समावेश आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय युवा आणि युवती निश्चितच दर्जेदार कामगिरी करतील, अशी आशा अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.