मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर
वृत्तसंस्था, क्वालालंपूर : मध्यपूर्वेतील संघर्ष आणि सौदी अरेबियातील सुरक्षेच्या चिंतेमुळे आशियाई फुटबॉल महासंघाने 2027 चा आशियाई चषक जवळपास एका वर्षासाठी पुढे ढकलला आहे. एएफसीने मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सौदीतील आयोजकांशी विस्तृत चर्चा केल्यानंतर स्पर्धा 7 जानेवारीवरून पुढे ढकलून 23 डिसेंबर, 2027 रोजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रादेशिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या असाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजन समितीने स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्यास मान्यता दिली आहे, असे असे एएफसीने एका निवेदनात म्हटले आहे. नवीन तारखा 23 डिसेंबर, 2027 ते 21 जानेवारी, 2028 अशा असून त्या मंजुरीसाठी फिफाकडे सादर केल्या जातील. स्पर्धा पुढे ढकलण्याच्या या निर्णयामुळे स्थानिक आयोजकांनी अलीकडेपर्यंत नाकारलेल्या स्पर्धेच्या स्थगितीबद्दलच्या अनेक महिन्यांच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या आठवड्यातच सौदी अधिकाऱ्यांनी या स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले होते. येमेनच्या इराण समर्थित हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियामध्ये केलेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतरही नियोजन योग्य मार्गावर आहे, याची खंडीय फुटबॉल संघटपेला खात्री देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते. आयोजन समितीचे प्रवत्ते मुहम्मद क्यू अलघमदी यांनी गेल्या महिन्यात टोकियो येथे झालेल्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या बैठकीत सदस्यांना सांगितले होते की, प्रादेशिक संघर्ष असूनही सौदी अरेबियामध्ये दैनंदिन जीवन सुरू आहे. त्या बैठकीपूर्वी एएफसीचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांनी गरज पडल्यास आशियाई चषक एका वर्षासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते.
