आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी
वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत शनिवारी विद्यमान विजेता आणि यजमान भारत व ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता चीन यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत या दोन्ही संघांनी आपले प्रत्येकी तीन सामने जिंकून विजयी घोडदौड राखल्याने यजमान भारतीय हॉकी संघाची शनिवारच्या सामन्यात सत्वपरीक्षा ठरणार आहे.
या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत आणि चीन या दोन्ही संघांनी समान गुण मिळविले असले तरी सरस गोल सरासरीच्या जोरावर चीन पहिल्या स्थानावर आहे. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात आहे. राऊंड रॉबिन फेरी अखेर आघाडीचे पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 2023-24 च्या प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेत या दोन संघांमध्ये शेवटची गाठ पडली होती. सलिमा टे.टे.च्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात 8 मैदानी गोल आणि 5 पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. चीन आणि भारत यांच्यातील शनिवारचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरेल. शनिवारी या स्पर्धेत मलेशिया आणि जपान तसेच कोरिया आणि थायलंड यांच्यात सामने खेळविले जातील.