For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोजशाळेमध्ये एएसआय सर्वेक्षणाला प्रारंभ

06:10 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भोजशाळेमध्ये एएसआय सर्वेक्षणाला प्रारंभ
Advertisement

कडेकोट सुरक्षा ; याचिकेवरील तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळली

Advertisement

वृत्तसंस्था/ धार

मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण केले जात आहे. दिल्ली आणि भोपाळच्या पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू असतानाच या सर्वेक्षणावर बंदी घालण्यासाठी मुस्लीम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तात्काळ सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Advertisement

भोजशाला सर्वेक्षण प्रकरणात मुस्लीम पक्षाने 16 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने 1 एप्रिल रोजी सुनावणीची तारीख दिली होती. त्यानंतर शुक्रवारपासून सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे मुस्लीम पक्षाने तातडीने सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारच्या नमाजच्या कारणास्तव दुपारी 12 वाजल्यापासून सर्वेक्षणाचे काम बंद करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी 4 वाजल्यापासून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्यात आले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला 6 आठवड्यांच्या आत सर्वेक्षण करून अहवाल सादर करायचा आहे.

भोजशाळेतील सर्वेक्षणादरम्यान भारतीय पुरातत्व विभागाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे धार पोलीसप्रमुख मनोज सिंह यांनी सांगितले. आमच्या मॉनिटरिंग टीमकडून सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे. भोजशाळेशी संबंधित संदेश आणि पोस्टवर बंदी आहे. सुरक्षेसाठी भोपाळहून अतिरिक्त पोलीस तुकडी मागविण्यात आली आहे. भोजशाळेत एएसपी डॉ. इंद्रजित बकलवार, सीएसपी, तीन डीएसपी, आठ पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्यासह 175 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरातील उंच इमारतींवरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील 25 चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळी 6 वाजल्यापासून सर्वेक्षण

उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाच्या आदेशानुसार धार येथील भोजशाळेचे वैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. दिल्ली आणि भोपाळ येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने इमारतीची पाहणी केली. तर 60 पॅमेऱ्यांच्या साहाय्याने देखरेख केली जात आहे. सर्वेक्षणासाठी बँक्वेट हॉलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ज्ञान व्यापीच्या धर्तीवर भोजशाळेतही एएसआयचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू झाल्याचे हिंदू संघटनेचे वकील शिरीष दुबे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.