बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये अश्विन हुकमी एक्का विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर
अश्विनकडे अनुभवाचा खजाना : ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर जादुई कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ पर्थ
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरु होणार आहे. जगभरातील चाहत्यांच्या नजरा या मालिकेकडे लागून राहिल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतील दोन सर्वोत्तम संघांमध्ये ही लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत ते कायम राहील. प्रदीर्घ कालावधीनंतर मायदेशात मालिका विजयावर ऑस्ट्रेलियाचे लक्ष असेल. या मालिकेदरम्यान भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी असणार आहे.
भारताचा अनुभवी व अव्वल फिरकीपटू आर. अश्विनकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. विशेष म्हणजे, मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज होता. त्याने तीन कसोटीत 12 बळी घेण्याची किमया केली होती. यंदाच्या या महत्वपूर्ण दौऱ्यात अश्विनला या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल. अलीकडेच अश्विनने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनला मागे टाकले आहे. या मालिकेदरम्यान अश्विनकडे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 200 बळी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तो पाच 6 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. तर तो डब्ल्यूटीसीमध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनेल. अश्विनच्या नावावर आता 194 विकेट्स आहेत. नॅथन लियॉनने 187 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान लायन आणि अश्विन 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरु होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेदरम्यान खेळाच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- आर. अश्विन (भारत) - 194
- नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 187
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 175
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - 147
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 134.
विराटशी पंगा घेऊ नका...
विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात नाही. त्यामुळे विराटला डिवचलं तर तो लवकर बाद होईल, अशी रणनिती ऑस्ट्रेलियाचा संघ आखत होता. पण विराटच्या नादाला लागू नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियन संघाला आता त्यांच्याच देशाच्या एका दिग्गज खेळाडूने दिला आहे. माजी अष्टपैलू शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियन संघाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला. ‘विराटला डिवचू नका, कारण अशा छेडछाडीनंतर तो पेटून उठत सर्वोत्तम कामगिरी करतो‘, विराटला चिथावणी देण्याचा परिणाम काय होतो, हे मी स्वत: अनुभवले आहे. प्रत्येक चेंडूवर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे, अशा भावनेने विराट कायम क्रिकेट खेळतो. जे खरोखरच अप्रतिम आहे‘, असे कौतुकही वॉटसनने केले. अलीकडील सामन्यातील विराटची कामगिरी पाहिली की, त्याच्यातली ती आग आता शमल्यासारखी वाटते. जे सहाजिकही आहे. कारण एवढ्या वर्षांनंतर प्रत्येक सामन्यात त्याच इर्ष्येने खेळणे कठीण असते, पण याचा असा अर्थ होत नाही की विराटची बॅट शांत झाली आहे. त्याच्यातली आग शांत असणे हे ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचे आहे, असेही वॉटसन यावेळी बोलताना म्हणाला. पाचव्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या विराटकडून कशी कामगिरी होते हे पाहणे उत्सुकतेचे आहे असेही तो म्हणाला.