For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईत अश्विन-जडेजाची बाझबॉल स्टाईल बॅटिंग

06:10 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईत अश्विन जडेजाची बाझबॉल स्टाईल बॅटिंग
Advertisement

बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी, पहिला दिवस : अश्विनचे कसोटीतील वेगवान शतक, जडेजा शतकासमीप, भारत 6 बाद 339, हसन मेहमूदचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

टीम इंडियाचा अण्णा अर्थात रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या जोडीने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडियाची लाज राखली. चेपॉक स्टेडियमवर  कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाची खराब सुरुवात झाली, पण नंतर अश्विन व जडेजाच्या 195 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला तीनशे धावांचा पल्ला गाठता आला. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील वेगवान शतक झळकावताना 112 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. जडेजानेही 86 धावांची नाबाद खेळी साकारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 80 षटकांत 6 गडी गमावत 339 धावापर्यंत मजल मारली होती. प्रारंभी, बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. डावातील सहाव्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा 6 धावा काढून बाद झाला. तब्बल सहा महिन्यानंतर कसोटीत खेळणारा रोहित यावेळी चाचपडताना दिसला. हसन मेहमुदने त्याला बाद करत बांगलादेशला पहिले यश मिळवून दिले.

Advertisement

जैस्वालची यशस्वी खेळी,विराट, गिल फ्लॉप

रोहित बाद झाल्यानंतर पुढील षटकात शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. हसन मेहमुदने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. गिल परतल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. विराटची मैदानावर एंट्री होताच चाहत्यांनी कोहली-कोहलीचा नारा दिला. दीर्घ कालावधीनंतर कसोटी खेळणारा विराट 6 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. त्याला हसन मेहमुदने बाद केले. यावेळी टीम इंडियाची 3 बाद 34 अशी स्थिती झाली होती. या बिकट स्थितीत यशस्वी जैस्वाल व रिषभ पंत या जोडीने 62 धावांची भागीदारी करत डाव सावरला. जैस्वालने अर्धशतकी खेळी साकारताना 118 चेंडूत 9 चौकारासह 56 धावा फटकावल्या. तर जीवघेण्या अपघातातून सावरुन कसोटीत पुनरागमन करणाऱ्या पंतने 6 चौकारासह 39 धावांचे योगदान दिले. ही जोडी जमलेली असताना मेहमुदने पंतला बाद करत बांगलादेशला चौथे यश मिळवून दिले. लंच ब्रेकनंतर जैस्वालही 56 धावा काढून माघारी परतला. संघात स्थान मिळवण्यासाठी चाचपडत असलेला केएल राहुलही यावेळी अपयशी ठरला. 16 धावांवर त्याला मेहदी हसनने माघारी धाडले.

अश्विनचे सहावे कसोटी शतक, जडेजाही चमकला

सलामीचे दिग्गज स्वस्तात बाद झाल्यानंतर टीम इंडियाची एकवेळ 6 बाद 144 अशी स्थिती झाली होती. यावेळी लोकल बॉय अश्विन मैदानात समर्थपणे उभा राहिला. त्याला जडेजाने मोलाची साथ दिली. या जोडीने सातव्या गड्यासाठी 195 धावांची अभेद्य भागीदारी करत टीम इंडियाला तीनशेचा पल्ला गाठून दिला. या जोडीने बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना बाझबॉल स्टाईल बॅटिंग केली. यादरम्यान, अश्विनने आपले कसोटीतील सहावे शतक झळकावताना 112 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह नाबाद 102 धावा केल्या. जडेजानेही तुफानी फलंदाजी करताना 117 चेंडूत नाबाद 86 धावांचे योगदान दिले. यावेळी त्याने 10 चौकार व 2 षटकार खेचले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 80 षटकांत 6 बाद 339 धावा केल्या होत्या. अश्विन 102 तर जडेजा 86 धावांवर खेळत होते. बांगलादेशकडून हसन मेहमुदने सर्वाधिक 4 बळी घेतले तर राणा, मिराज यांना एकेक बळी मिळाला.

जडेजा-अश्विनची  बांगलादेशविरुद्ध विक्रमी भागीदारी

अश्विन आणि जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर अश्विनने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या षटकापासूनच बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. त्याला जडेजानेही चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून 7 व्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध 7 व्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता, ज्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम जडेजा व अश्विनने आपल्या नावे केला.

अश्विनचे कसोटीतील वेगवान शतक, अनोखा विक्रमही नावे

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत अश्विनने शानदार शतक ठोकले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक तर सर्वात वेगवान कसोटी शतक देखील ठरले. अश्विनने 108 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. याआधी 2011 मध्ये विंडीजविरुद्ध त्याने 117 चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय, अश्विनने बांगलादेशविरुद्ध कसोटीत प्रथमच शतक झळकावले. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध 1 तर विंडीजविरुद्ध चार शतके झळकावली आहेत. याशिवाय, अश्विन आता कसोटीत 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा, 36 वेळा पाचपेक्षा जास्त विकेट्स घेणारा, कसोटीत सहा शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत अश्विननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे.

जैस्वालचाही अनोखा विक्रम

2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून यशस्वी जैस्वालने आतापर्यंत अफलातून कामगिरी केली आहे. 22 वर्षीय युवा खेळाडूने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. मायदेशात पहिल्या 10 डावात 750 हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील तो पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावे होता, त्याने ज्याने 1935 मध्ये 10 डावात 747 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव 80 षटकांत 6 बाद 339 (यशस्वी जैस्वाल 9 चौकारासह 56, रोहित शर्मा 6, शुभमन गिल 0, विराट कोहली 6, रिषभ पंत 6 चौकारासह 39, केएल राहुल 16, रवींद्र जडेजा खेळत आहे 117 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह खेळत आहे 86, आर. अश्विन खेळत आहे 112 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह खेळत आहे 102, हसन मेहमुद 58 धावांत 4 बळी, नाहिद राणा व मेहदी हसन मिराज प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.