बुमराहला मागे टाकत अश्विन पुन्हा अग्रस्थानी,
आयसीसी मानांकन : रोहित शर्मा पुन्हा टॉप टेनमध्ये दाखल
दुबई
कारकिर्दीतील शंभराव्या कसोटीत 9 बळी मिळविल्यामुळे रविचंद्रन अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात पुन्हा एकदा अग्रस्थान पटकावले आहे. कर्णधार रोहित शर्माही फलंदाजांच्या मानांकनात पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये आला असून त्याने आता सहावे स्थान मिळविले आहे.
बुधवारी आयसीसीने ताजी मानांकन यादी जाहीर केली. धरमशालामध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या व शेवटच्या कसोटीत ऑफस्पिनर अश्विनने शानदार प्रदर्शन करीत पहिल्या डावात चार व दुसऱ्या डावात 5 बळी मिळविले. पाच बळी मिळविण्याची त्याची ही 36 वी वेळ होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने संघसहकारी जसप्रित बुमराहला अग्रस्थानावरून बाजूला सारत पहिले स्थान पटकावले.
धरमशालामध्ये शतक नोंदवणाऱ्या रोहितने पाच स्थानांची प्रगती करीत सहावे स्थान मिळविले. अग्रस्थानावरील केन विल्यम्सनपेक्षा तो 108 रेटिंग गुणांनी मागे राहिला आहे. यशस्वी जैस्वालने दोन स्थानांची प्रगती करीत आठवे, शुभमन गिलने 11 स्थानांची प्रगती करीत 20 वे स्थान मिळविले असून त्यांचे हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे. बुमराह आता ऑस्ट्रेलिया हॅझलवूडसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. हॅझलवूडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सहा बळी मिळविले, याचा त्याला फायदा झाला.
अश्विनचा संघसहकारी कुलदीप यादवने कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन मिळविले असून त्याने 15 स्थानांची झेप घेत गोलंदाजांमध्ये सोळावे स्थान घेतले आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत सात बळी मिळवित तो सामनावीरचा मानकरी ठरला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीनेही आजवरचे सर्वोच्च मानांकन मिळविले असून सहा स्थानांची झेप घेत त्याने 12 वे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजा अग्रस्थानी असून अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन स्थानांची बढत मिळवित आठवे स्थान घेतले आहे.