For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशुतोष गोवारीकर यांची ‘इफ्फी’ संचालकपदी नियुक्ती

03:04 PM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशुतोष गोवारीकर यांची ‘इफ्फी’ संचालकपदी नियुक्ती
Advertisement

पणजी : माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रख्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची गोव्यात होणाऱ्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गोवारीकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान असलेले ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. इफ्फीसोबत त्यांचा अनेक दशकांचा संबंध असून, जागतिक चित्रपट संस्कृती आणि चित्रकलेच्या विकासाशी त्यांचे सखोल नाते प्रतिबिंबित होते. आपल्या नियुक्तीबाबत मत व्यक्त करताना गोवारीकर म्हणाले की, महोत्सव संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंददायी आहे. 1952 पासून महोत्सव आयोजनात सहभागी असलेल्या अनेक चमूंनी घडवलेली, जपलेली आणि विस्तारलेली परंपरा पुढे नेणे हा मोठा सन्मान असून त्यासोबत नव्या जबाबदारीची जाणीवही आहे.

Advertisement

माहिती व प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकारसोबत जवळून काम करण्याची ते अपेक्षा बाळगतात. 1952 मध्ये सुरू झालेला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सातत्याने आयोजित होणारा चित्रपट महोत्सव आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा सरकारच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्यातर्फे आयोजित हा महोत्सव आज जागतिक चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा संगमबिंदू बनला आहे. गोव्याच्या सुंदर किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2026 मध्ये होणारे 57 वा इफ्फी महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साकारला जाणार असून विविध भाषा, शैली, तंत्रज्ञान आणि कथन परंपरांचा समृद्ध संगम घडवून आणला जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.