अशुतोश दीक्षित यांच्याकडून ‘स्वदेशी’चे कौतुक
‘सिंदूर’ अभियानात भारतीय शस्त्रास्त्रांची निर्णायक कामगिरी, देशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या एकत्रित सेनादलांचे प्रमुख एअर मार्शल अशुतोश दीक्षित यांनी स्वदेशी शस्त्रास्त्रांची प्रशंसा केली आहे. ‘सिंदूर’ अभियानात या स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांनी भारताच्या यशात निर्णायक भूमिका साकारली आहे. भारतनिर्मित वायुसुरक्षा यंत्रणेने या अभियानात पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांचा नायनाट केला. त्यामुळे भारताची हानी झाली नाही. यापुढच्या काळातही स्वदेशी शस्त्रतंत्रज्ञान विकासाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.
भारताच्या शस्त्रसंभारात अलिकडच्या काळातच स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. हा एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. स्वदेशी शस्त्रास्त्रांच्यामुळे आम्हाला संरक्षणाचा एक समर्थ पर्याय उपलब्ध झाला आहे. या शस्त्रांमुळे आम्हाला आमची सीमा न ओलांडता शत्रूच्या प्रदेशात दूरवर असणारी लक्ष्ये भेदणे शक्य झाले आहे. तसेच आमच्या आस्थापनांचे शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण करणेही साध्य झाले आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानावरचा आमचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्वत:च्या सीमेत राहून शत्रूची प्रचंड हानी करणे, हे आता आमचे नवे संघर्षतत्व बनले आहे. केंद सरकारचे हेच म्हणणे आहे. मी सरकारच्या या म्हणण्याचे समर्थन करत आहे, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.
संघर्ष आमच्या निवडीनुसार
दहशतवादाविरोधात केव्हा संघर्ष करायचा, कोठे करायचा आणि किती प्रमाणात करायचा, हे आता आमची सेनादले ठरविणार आहेत. ‘सिंदूर’ अभियानात याचे प्रत्यंतर आले आहे. आम्ही पाकिस्तानला जो दणका दिला, तो भेदक होता. पाकिस्तानचे अनेक वायुतळ आम्ही उध्वस्त केले. नूर खान तळ हा त्याचा सर्वात सर्वात प्रबळ परिणाम आहे, जो स्पष्टपणे दिसून आला आहे. पाकिस्तानचे 10 वायुतळ उध्वस्त झाले आहेत, हे त्या देशानेच मान्य केले आहे. आमचे अभियान अत्यंत फलद्रूप ठरले, असे प्रतिपादन अशुतोश दीक्षित यांनी केले.
चीनच्याही शस्त्रांना चोख प्रत्युत्तर
या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानने चीनी बनावटीच्या पाचव्या पिढीतील शस्त्रास्त्रांचा उपयोग केला. मात्र तो प्रयोग असफल ठरला. आमच्या शस्त्रप्रणाली सरस ठरल्या. आम्ही आता आकाशातून भूमीवर मारा करु शकणारे तंत्रज्ञान अधिक विकसीत करण्यावर भर देत आहोत. केंद्र सरकार स्वदेशी तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगात आणण्याचे धोरण अधिक बळकट करीत आहे. त्याला सेनादलांकडूनही समर्थन मिळत आहे. आमचे सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञान देशातच विकसीत करण्यावर भर देत आहे. ही बाब देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. आपल्या सैनिकांचा आणि सेनाधिकाऱ्यांचा संयुक्त सरावावर अधिक भर पुढच्या काळातही असेल. असा सराव अधिक प्रमाणात केल्याने तीन्ही सेनादलांचा एकमेकांशी समन्वय परिपूर्ण पद्धतीने होतो, अशी मांडणी अशुतोश दीक्षित यांनी केली.
ड्रोन्ससंबंधी महत्वाचे विधान
आगामी काही वर्षांमध्ये युद्धांमध्ये किंवा सशस्त्र संघर्षांमध्ये युद्धविमानांचे स्थान ड्रोन्स पटकाविणार आहेत, असे विधान अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी केले आहे. त्यासंबंधी दीक्षित यांनी महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या आयुष्यात तरी तसे होणार नाही. आजही युद्धविमानांचे महत्व ड्रोन्सपेक्षा कितीतरी अधिक आहे. यापुढचा बराच काळ तरी ही परिस्थिती अशीच राहणार आहे. नंतरच्या काळात कदाचित असे होऊ शकेल. पण सध्यातरी युद्धविमाने हाच संरक्षणाचा मोठा आधार असतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वदेशी बळकट होणे आवश्यक
ड भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला यापुढे अधिक महत्व दिले जाणार
ड ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानला दिला प्रचंड दणका, केली मोठी हानी
ड सध्याच्या काळात तरी युद्ध विमानांचा प्रभाव ड्रोन्सपेक्षा कितीतरी अधिक
ड संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देण्याचे केंद्राचे धोरण समर्थनीय