आशुतोष दीक्षित 29 वे वायुदल प्रमुख
पदभार स्वीकारला : 42 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंग सेवानिवृत्त : ‘गार्ड ऑफ ऑनर’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी 29 वे वायुदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग 42 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर आता दीक्षित यांना संधी मिळाली आहे. एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांच्याकडे कमांड सोपवण्यापूर्वी निवृत्त होणारे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांना एअर फोर्स स्टेशनच्या परेड मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये दाखल झाले. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांना ऑपरेशन्स, उ•ाण चाचणी, क्षमता विकास आणि संयुक्त स्टाफ असाइनमेंट्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्रियपणे काम करण्याचा अनुभव आहे.
3,300 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव
एक निष्णात फायटर पायलट, पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी पायलट म्हणून दीक्षित यांना मिराज-2000, मिगची विविध रूपे, जॅग्वार आणि अनेक वाहतूक विमानांसह विविध प्रकारच्या विमानांवर 3,300 तासांहून अधिक उ•ाणाचा अनुभव आहे. एअर चीफ मार्शल दीक्षित हे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. जग्वार आणि मिग-27 अपग्रेड प्रकल्पांना अंतिम रूप देण्यात, तसेच एलसीए एमके-1 तेजससाठी प्रारंभिक कार्यान्वयन मंजुरी आणि अंतिम कार्यान्वयन मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
एअर चीफ मार्शल दीक्षित यांनी सदर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर, साऊथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर आणि डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी क्षमता विकास आणि खरेदीशी संबंधित महत्त्वाच्या उपक्रमांचे नेतृत्व केले. त्याचबरोबर सेंट्रल एअर कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. नंतर, त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांच्या अंतर्गत) म्हणूनही काम पाहिले. वायुसेना प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी उप-वायुसेना प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
विविध पदकांचे मानकरी
एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी बांगलादेशातील डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि नवी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांना वायू सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
