शहर परिसरात अष्टमी भक्तिभावाने साजरी
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी अष्टमी अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने देवीसमोर कुंकुमार्चन तसेच मंदिरांमध्ये, घराघरांमध्ये कुमारी पूजन करण्यात आले. सोमवारी अष्टमी लागल्याने सालाबादप्रमाणे देशपांडे गल्लीतील परांजपे कुटुंबीयांतर्फे घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. देशपांडे कुटुंबीयांचे यंदाचे हे 89 वे वर्ष होते. पूर्वी कडोलकर गल्ली येथे त्या काळातील ज्येष्ठ महिलांनी महालक्ष्मी बसवून ही प्रथा सुरू केली होती. त्या काळी देवीच्या दर्शनासाठी ब्रिटीश अधिकारीसुद्धा येऊन गेले होते. रात्री 8 वाजता महालक्ष्मी उभी करण्यात आली. त्यानंतर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. दरम्यान, अष्टमीनिमित्त कुमारी पूजन करण्यात आले. कुमारी पूजन केल्याने घरांमध्ये सौख्य आणि समृद्धी येते अशी धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी हे पूजन करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. कुमारिकांचे पाय धुवून त्यांना हळदीकुंकू व बांगड्या व भेटवस्तू देण्यात आली. विविध मंडळांनी नवरात्रीच्या निमित्ताने देवीची मूर्ती बसवून दररोज तिची विविध स्वरुपात पूजा केली. अष्टमीच्या निमित्ताने बहुसंख्य मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सर्वच ठिकाणी महाप्रसादासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत महाप्रसाद सुरू होता.