अष्टगंधा, व्हिजनरीज, माशेल महिला अर्बनची मालमत्ता होणार जप्त
सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती
पणजी : राज्यातील तीन वादग्रस्त सहकारी पतसंस्थांचे भवितव्य पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये ठरविणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.माशेल महिला, व्हिजनरीज आणि अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थांमध्ये ठेविदारांच्या पैशांचा गैरवापर व अफरातफर झाल्यामुळे त्या वादग्रस्त बनल्या आहेत. आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेविदारांनी तगादा लावल्यानंतरही त्यांना पैसे मिळालेले नसल्यामुळे त्यासंबंधी अनेकांनी आपली गाऱ्हाणी सरकारकडे मांडली आहेत. त्यांची गांभीर्याने दखल घेताना आता या संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली. बुधवारी पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संस्थांच्या मालमत्ता जप्त करून त्याद्वारे फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा विचार सरकार करत आहे. लोकांना पूर्ण रक्कम मिळणार नसली तरीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन शिरोडकर यांनी दिले.