अशोक लेलँडही वाहनांच्या किंमती वाढवणार
1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू होणार असल्याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन क्षेत्रातील हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जानेवारी 2025 पासून सीव्हीच्या संपूर्ण श्रेणीच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली. या अगोदर टाटा मोटर्सनेही आपल्या सीव्हीच्या किमतीत वाढ जाहीर केली होती.
अशोक लेलँडने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल आणि प्रकारानुसार ही वाढ वेगवेगळी राहणार आहे. महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे किमतीत वाढ करणे गरजेचे होते, असे कंपनीने स्पष्टीकरण दिलेले आहे. यामुळे कंपनीला इनपुट कॉस्टचा वाढता खर्च कमी करण्यास मदत होणार आहे.
टाटा मोटर्सच्या बस, ट्रकही महाग
यापूर्वी, टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2025 पासून ट्रक आणि बसेसच्या किमतीत 2 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या निवेदनानुसार, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही दरवाढ आवश्यक होती.
अन्य कंपन्यांकडून दरवाढ
नव्या वर्षापासून प्रवासी वाहनांच्या किमतीही वाढणार आहेत. मारुती सुझुकी, ह्युंडाई मोटर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्ससह अनेक प्रवासी कार उत्पादकांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लक्झरी कार कंपन्या-मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांनी वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे म्हटले आहे.