अशोक खरातचा पाय मनी लॉड्रिंग प्रकरणी खोलात...न्यायालयाने सुनावली ९ जूनपर्यंत कोठडी
ज्योतिषी असल्याचे भासवून अनेक महिलांशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर अशोक खरात या भोंदूला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. अनेक महिलांशी अशोक खरातने शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पुरावेच सादर होत गेले सोबतच खरातने जमवलेली मायासुद्धा तपास यंत्रणांनी उघड केली.
मनी लॉड्रींग आणि अशोक खरात
ANI च्या वृत्तानुसार आता सक्तवसुली संचालनालयाने सुनावलेली अशोक खरातची कोठडी संपताच आता मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने अशोक खरातला ९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आर्थिक अनियमितता आणि मनी लाँडरिंगप्रकरणी अशोक खरातला 19 मे रोजी अटक केल्यानंतर गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेली त्याची कोठडी आज मंगळवारी संपली.
न्यायालयात ईडीच्या वकिलांनी सांगितले की अशोक खरातची चौकशी पूर्ण झाली असून आता त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही पण भविष्यात त्याच्या चौकशीची गरज भासल्यास पुन्हा त्याला कोठडीत पाठवले जाऊ शकते.
खरातची रवानगी आता कुठे?
मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानंतर खरातला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले जाऊ शकते. हे प्रकरण अध्यात्मिक मार्गदर्शन, आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषणाशी संबंधित आहे.
सक्तवसुली संचालनालयाने नाशिकमधल्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार शोधमोहिम राबवली होती.
इतरांच्या नावे बँकेत खाती
समोर आलेल्या तपासात ईडीला असे दिसून आले की, खरातने नाशिकमधल्या अनेक सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांच्या नावे खाती काढून स्वत:चा मोबाईल नंबर त्या खात्यांना जोडला तसेच त्या खात्यांचा नॉमिनी म्हणूनही त्याने आपलेच नाव नमूद केले आहे. साध्या साध्या वस्तूंना खरात दैवी शक्तीने प्रभावित असलेल्या वस्तू आहेत असं सांगून अमाप किंमतीला विकत असे आणि तो पैसा इतरांच्या नावावर गुंतवत असे.