अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसला मोठा धक्का
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. हा कार्यक्रम मंगळवारी मुंबई भाजप कार्यालयात झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आपण अशोक चव्हाण यांच्याशी बोललो तेव्हा मला कोणतेही मोठे पद नको असल्याचं सांगितलं. कारण त्यांनी यापुर्वी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं आहे. पण आता त्यांना नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेती लोकांच्या विकासाच्या कामात सहभागी व्हायचे असल्याचं म्हटलं आहे.
काल आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर दोन दिवसानंतर मी आपली पुढील राजकिय वाटचाल काय असेन असा खुलासा अशोक चव्हाण यांनी दिला होता. पण आज लगेच मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेशासाठी लगबग सुरु झाल्याची पहायला मिळाली.
आज 12 वाजता भाजपच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनीही उपस्थिती लावली . बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. अशोक चव्हाण यांनी सहि करून रीतसर त्याची पावती केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, "नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विकासकामात योगदान देण्याच्या इच्छेने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला कोणत्याही पदाची आशा नाही. मी गेली ३८ वर्षे राजकारणात काम केल्यानंतर ही माझी नविन इनिंग ठरणार आहे."
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांचे पक्षातून बाहेर पडणे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. कारण या आधीच मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांसारखे प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांनी काँग्रेसकडे पाठ केली आहे. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.