आशिष नेहराची गोव्यात दादागिरी
झाडे तोडली, सपाटीकरण, रस्ताही केला : ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये खुलेआम प्रकार
मडगाव : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलदांज आशिष नेहरा यांने केळशी ग्राम पंचायत क्षेत्रात जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी ‘नो डेव्हलपमेंट झोन’ मध्ये झाडे तोडण्यात आली आहेत. सपाटीकरणाचे काम केले असून आता रस्ता केला जात आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर केळशी पंचायतीने काम बंद ठेवण्यास सांगितले असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केळशी पंचायत क्षेत्रातील समुद्रकिनारी माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने जमीन खरेदी केली असून ती विकसित केली जात आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बेकायदा बांधकाम केले जात असल्याने पंचायतीने काम बंद करण्याची नोटीस जारी केली आहे. तसेच कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे. स्थानिक पंचांकडून सांगण्यात आले की, नेहरा यांच्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीत बांधकाम करताना वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी आत येत आहे. याशिवाय झाडांची कत्तल करून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलेले आहे. सीआरझेड प्राधिकरणाकडे या संदर्भात तक्रार केली असली तरी त्यांनी या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सरकारकडून या कामाला पाठिंबा दिला जात असल्याचे दिसून येते असे पंच सदस्य आयरिश पसान्हा यांनी सांगितले.
परवानगी शिवाय कोणतेही काम करता येणार नाही
केळशीचे सरपंच डिक्सन वाझ या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की, जून महिन्यात किनारी भागात रस्ता केला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. ‘ती जागा तिघांची असून त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम केले जाऊ शकत नाही. त्यामुळे काम बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. खाजगी जागा असली तरीही परवानगीशिवाय कोणतेही काम केले जाऊ देणार नाही. जूनपासून काम बंद करण्यात आले आहे.