Ashadhi Wari 2025: पांडुरंगाने महाराष्ट्र चालवण्याची शक्ती द्यावी, CM फडणवीसांचे विठ्ठलचरणी साकडं
शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक, कुटुंबासहित उपस्थित होते
Ashadhi Wari 2025 Shasakiy Mahapuja : आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटेपासून पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पांडुरंगाला अभिषेक पार पडला. या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक, कुटुंबासहित उपस्थित होते.
यावेळी मानाचे वारकरी म्हणून नाशिक येथील जातेगावचे वारकरी कैलास उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना पूजेचा मान मिळाला. विठुरायाने महारष्ट्र चालवण्याची शक्ती द्यावी, असं साकडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलचरणी घातले आहे.
यंदा वारीत मोठी गर्दी झाली आहे. सोशल मिडीयावरही अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे. वारीत तरुणांची संख्या वाढली आहे. शासनाने वारीत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जात आहे यामध्ये आध्यात्मिक प्रगती महत्वाची आहे. पांडुरंगाला एकच मागणे आहे की सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्यावी, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
आषाढीनिमित्त टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली. ग्यानबा-तुकाराचा अखंड पाठ आणि देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी जमले होते. शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी पांडुरंगाला साकडे घातले.
महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी आणि बळीराजाला आनंदाचे क्षण द्यावेत, असे साकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले आहे. एकादशीसाठी पंढरपुरात सुमारे 18 लाख भाविकांची मांदियाळी आहे. याच पंधरा लाख भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली.
दरम्यान, ज्याला ज्याला दुर्बुद्धी सुचली त्याच काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. विरोधकांनी सद्मार्गाने चालावे. वारीत कुणालाही येण्याची परवानगी आहे, पण येताना देवाच्या भक्तीने इथे या. आपला अजेंडा चालवण्यासाठी कोणी येत असेल तर चालणार नाही, असा टोमनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.