Ashadhi Wari 2025: ग्यानबा-तुकारामाच्या गजरात सांगरुळ परिसरातील दिंड्या पालखी सोहळ्यासाठी रवाना
परिसरातील हजारो वारकरी आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी सहभागी होतात
By : गजानन लव्हटे
सांगरूळ : करवीर तालुक्यातील सांगरूळ परिसरातील वारकरी सांप्रदायिक दिंड्यांचे आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देहू-आळंदीकडे प्रस्थान झाले. दिंडीमधील सहभागी भक्तांना, वारकऱ्यांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा दिल्या. आळंदी येथून बुधवार दिनांक १८ जून रोजी ज्ञानेश्वर-माऊली पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून पालखी सोहळ्यामध्ये सर्व लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होणार आहेत.
सांगरुळसह परिसरातील वारकरी संप्रदाय गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या फडाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. दरवर्षी परिसरातील हजारो वारकरी आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी सहभागी होतात. सांगरूळ येथून तीन दिंड्या आषाढीवारी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
गावातील वारकरी संप्रदाय मंडळाने गावातून दिंडी काढत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. येथील धोंडीराम खाडे, दिनकर तळेकर, युवराज लव्हटे, आनंदा चव्हाण, वसंत खाडे, शहाजी कांबळे, यशवंत पाटील यांच्यासह जवळजवळ दीड-दोनशे वारकरी दिंडी सोहळ्यासाठी आळंदीकडे रवाना झाले आहेत.
परिसरातील म्हारुळ, बहिरेश्वर, आडूर परिसरातील वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांना सांगरूळ येथे शुभेच्छा देण्यात आल्या. कृष्णात लव्हटे, कृष्णात तोरस्कर, भाऊसो लव्हटे, नवनाथ लव्हटे, लहुजी लव्हटे, विजय नाळे, लक्ष्मी घुंगुरकर, चेंदाबाई लव्हटे, आनंदी घुंगुरकर, जयश्री लव्हटे, शुभांगी लव्हटे, रंजना तोरस्कर, सखुबाई यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संभाजी चव्हाण, गजानन पोतदार यांच्या ग्रुपचे तसेच केरबा नाळे यांच्या नाळे ग्रुपचे वारकरी दिंडी सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत . सांगरूळ परिसरातील आमशी, खाटांगळे, पासार्डे, कोपार्डे, आडूर, भामटे, चिंचवडे, कुडित्रे या परिसरातील दिंड्याचेही आळंदीकडे प्रस्थान झाले आहे.