Ashadhi Wari 2025: माऊलींच्या शासकीय महापूजेचे CM Devendra Fadnavis यांना मंदिर समितीकडून निमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून महापूजेचे निमंत्रण
पंढरपूर : आषाढी शुध्द एकादशी रविवार 06 जुलै 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री महोदयांना या भेटीत मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची माहिती तसेच विठ्ठल-रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती देण्यात आली.