आषाढी पावसाने गोव्याला झोडपले
राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती : दरडी, झाडे कोसळल्याने मोठे नुकसान, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
पणजी : आषाढाच्या मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले असून धारबांदोडा भागात गोव्यातील सर्वाधिक 9 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. यंदाच्या मोसमातील गोव्यातला सर्वाधिक पाऊस गेल्या 24 तासांत झालेला आहे. रात्रभर कोसळत राहिलेल्या पावसामुळे व त्याच्याबरोबर जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. घरांवर झाडे पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. जोरदार वृष्टीमुळे राज्यातील बहुतांश नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आणि पूरसदृश स्थिती निर्माण झाली. पारोडा येथे नदीला आलेल्या पुरामुळे मडगावला जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.
आजही जोरदार वृष्टी होण्याची शक्यता व्यक्त कऊन हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोवा सरकारने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब पडले, रस्ते पाण्याखाली गेले. तसेच अग्निशामन दलाची दमछाक झाली. गोव्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. राज्यभरात सर्वत्र पावसाने विक्रम केला. गेले काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र 1 जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. 2 जुलै रोजी राज्यभरात मुसळधार पाऊस पडला. 3 जुलैच्या पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस चालूच राहिला. गुऊवारी सकाळपासून मुसळधार पाऊस चालू राहिला व दुपारनंतर पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले.
आज ऑरेंज अलर्ट जारी
काल गुरुवारी हवामान खात्याने शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप रेड अलर्ट जारी केलेला नाही. मुख्यमंत्री गुरुवारी सांगे येथे गेले होते. वाटेत त्यांना पूरसदृश स्थितीचे दर्शन झाले. सांगे, केपे परिसरातील अनेक नद्या दुथडी भऊन वाहत आहेत. काही ग्रामीण भागातील विद्यार्थी या पाण्यात अडकले अर्थात त्यांना शाळेला जाता आले नाही.
धारबांदोडा : धो धो !
गेल्या 24 तासांमध्ये पावसाने संपूर्ण गोव्याला अक्षरश: झोडपून काढले. त्यातल्यात्यात धारबांदोड्याला प्रचंड झोडपले. तिथे 9 इंच एवढा विक्रमी पाऊस पडला. 13 पैकी गोव्यातील 10 केंद्रांवरील पावसाचे प्रमाण हे 6 इंचांपेक्षा जास्त होते. त्यामुळे गोव्यात गेल्या 24 तासांमध्ये पडलेला सरासरी पाऊस हा 6.50 इंच एवढा आहे. यंदाच्या मौसमातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यामुळे यंदाच्या मोसमातील पाऊस सरासरी 41 इंच झाला आहे. वार्षिक सरासरीपर्यंत तो पोहोचला असून पुढील 24 तासांमध्ये तो सरासरी ओलांडून पुढे जाणार आहे.
आज पुन्हा ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने आज दि. 4 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर दि 9 जुलैपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला असून वरील काळात काही भागात जोरदार तर इतर सर्व ठिकाणी मध्यम तथा हलक्या स्वऊपात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र वादळी वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किमी. असा राहील. पारंपरिक मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
आज राज्यातील शाळांना सुट्टी
आज शुक्रवारी पावसाचे प्रमाण वाढतेच राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जे शिक्षणमंत्री देखील आहेत, त्यांनी आज शुक्रवारी शाळांसाठी सार्वजनिक सुट्टी देण्यास सांगितले. शिक्षण संचालकांनी काल गुऊवारी त्यासंदर्भातील आदेश जारी केला. त्यानुसार गोव्यातील सर्व शाळा आज बंद राहतील. केवळ मुलांनाच नव्हे तर शिक्षकांनादेखील सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी फक्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे.
24 तासांतील पाऊस इंचाप्रमाणे
- धारबांदोडा - 9
- वाळपई - 6.25
- जुने गोवे - 7.50
- केपे - 6
- मडगाव - 7.50
- पणजी - 6
- म्हापसा -7
- दाबोळी - 5.50
- सांगे - 7
- काणकोण - 5
- फोंडा - 6.90
- पेडणे - 4.50
- सांखळी - 6.50
- मुरगाव - 4.50
चोवीस तासांत 43 झाडे उन्मळून पडली
गेल्या 24 तासात राज्यभरात 43 झाडे उन्मळून पडली आहेत. दरडी कोसळल्या, काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या तर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार घडले आहेत. घरावर, वाहनांवर झाडे पडल्याने लाखो ऊपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली, सत्तरी, सासष्टी, मुरगाव, सांगे, केपेसह फोंडा, धारबांदोडा तालुक्यात पावसामुळे मोठी पडझड झाली आहे.