दक्षिण सोलापूरच्या शाळांमध्ये आषाढी दिंडी उत्साहात
दक्षिण सोलापूर :
आषाढी वारीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पारंपरिक दिंडी सोहळे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. औराद येथील यशवंत विद्यालयात झालेल्या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाच्या जयघोषात भावपूर्ण सहभाग नोंदवला.
या सोहळ्याची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखी पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्यासह वारकरी रूपातील पोशाख परिधान करून परिसरातून टाळ, मृदुंग, विणेच्या तालावर दिंडी काढली. हातात भगवे पताके घेऊन विद्यार्थ्यांनी बाल वारकरी म्हणून सहभाग नोंदवला.
या दिंडीत लेझीमचे सादरीकरण, विठ्ठलाच्या अभंगांवर नृत्य व पारंपरिक रिंगण सोहळा यांचा मनोहारी संगम पाहायला मिळाला. "माऊली माऊली" च्या गजरात गावात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमात गावचे सरपंच श्री. शशिकांत बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना ५० लेझीम भेट दिल्या. तसेच श्री. रामचंद्र बशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली.
दिंडी सोहळ्याला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.