Asha Workers: आरोग्यरक्षक राखी अभियानात उत्स्फूर्त सहभाग, कशी आहे राखी पाठवण्याची प्रक्रिया?
आशा सेविका व गटप्रवर्तिकांकडून राख्या तयार करण्याची लगबग सुरू
कोल्हापूर : 'तरुण भारत संवाद' व जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या "आरोग्यरक्षक राखी“ अभियानात आशा सेविका व गटप्रर्वतिका उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. आशा सेविका व गटप्रवर्तिकांकडून राख्या तयार करण्याची लगबग सुरू आहे. ‘तरुण भारत संवाद“च्या सदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या अभियानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यासह शहरातील आशा स्वयंसेविका व गट प्रर्वतिकांना आरोग्याविषयी संदेश देणाऱ्या राख्या तयार करण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यातून आशा सेविका व गटप्रवर्तिकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.
काहींनी राख्या तयार करण्यास प्रारंभ केल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांना घरबसल्या कल्पकतेने आरोग्य विषयक संदेश देणाऱ्या राख्या तयार करण्याची संधी निर्माण झाली आहे. अभियानामध्ये सहभागी आशा सेविका व गटप्रवर्तिकांनी समाधान व्यक्त करत स्वागत केले.
तयार केलेल्या राख्या पाठविण्यासाठी केवळ एकच दिवस राहिल्याने आशा कर्मचारी राख्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या असल्याचे चित्र पहायला मिळाले. उद्या राख्या पाठविण्याची अंतिम मुदत आहे. तालुका निहाय आरोग्य अधिकारी पंचायत समिती व कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील आशांनी महापालिका आरोग्य विभागात जमा कराव्यात, असे आवाहन केले आहे.
यातील उत्कृष्ट राख्या बनविणाऱ्या प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे 12 पैठणी, कोल्हापूर शहरात 7, इचलकरंजी शहरात 3, गटप्रवर्तक 3 अशा एकूण 25 पैठणी बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून 50 आशा कर्मचाऱ्यांचा गोल्ड प्लेटेड गोट व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपक्रमात सर्व सहभागी आशासेविकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आशासेविका बांधणार आरोग्यमंत्र्यांना राखी
यातील उत्कृष्ट 10 राख्यांची निवड केली जाणार आहे. या 10 राख्या आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना बांधण्याचा मान आशासेविकांना मिळणार आहे.
पाठवा राखी बनवितानाचा शॉर्ट व्हिडिओ
राखी बनवत असतानाचा शॉर्ट व्हिडिओ तयार करुन ‘तरुण भारत संवाद“चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांच्या 9975401009 या मोबाईलवर पाठवावा. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
समाजाला दिशा देण्याचे काम
‘तरुण भारत संवाद’ ने बातम्यांसह नेहमी नवनवीन उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. ‘आरोग्यरक्षक राखी“ अभियानातून आशांना सेविकांना काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे. या माध्यमातून सदृढ आरोग्याबाबतचा समाजात जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. आरोग्यदुत म्हणून कार्य करणाऱ्या आशा सेविकांचे मनोबल उंचवणार आहे. सर्व आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी आरोग्य विषयक संदेश देणाऱ्या राख्या तयार करून अभियानात सहभागी व्हावे.
- डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका