Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील आसावरी महिमकर एक दिवसाची सरपंच का बनली?
12:44 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
By - समीर शेख
अंत्रोळी : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि प्रशासनाविषयीची समज विकसित व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाचे प्रतीकात्मक बालसरपंच’ उपक्रमांतर्गत अंत्रोळी येथील कु. आसावरी नरहरी महिमकर हिने गुरुवारी अंत्रोळी ग्रामपंचायतीत एक दिवसाची बालसरपंच म्हणून पदभार स्वीकारला.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या आणि कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या आसावरीच्या निवडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत समारंभाने झाली. कु.आसावरी नरहरी महिमकर व मान्यवरांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंडळ कृषी अधिकारी के. बी. सावंत यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी, आधुनिक शेती आणि ग्रामीण विकासाबाबत मार्गदर्शन केले.
बालसरपंच म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कु. आसावरी महिमकर हिने ग्रामपंचायतीच्या विविध विभागांची माहिती घेतली. ग्रामविकासाच्या योजना, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षणविषयक उपक्रम तसेच नागरिकांच्या समस्या यांची तिने सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेण्याची संधी तिला या उपक्रमातून मिळाली.
यावेळी बालसरपंच आसावरी महिमकर हिने ग्रामस्थांशी संवाद साधत शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी गणेश फडतरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बालसरपंच कु. आसावरी महिमकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नरहरी महिमकर यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
Advertisement
Advertisement