असदुद्दिन काढणार बिहारमध्ये ‘यात्रा’
वृत्तसंस्था / हैद्राबाद
मुस्लीम इतेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे खासदार असदुद्दिन ओवैसी बिहारमच्या सीमांचल भागात यात्रा काढणार आहेत, अशी घोषणा त्यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यातील सर्व पक्ष आणि युत्या या निवडणुकीच्या प्रचार कार्याला लागल्या आहेत. ओवैसी यांनीही काही मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहारच्या सीमांचल भागात मुस्लीमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ते याच भागातील काही जागांवर त्यांचे उमेदवार उभे करतील, अशी शक्यता त्यांच्या पक्षाने व्यक्त केली आहे.
त्यांची ही प्रस्तावित यात्रा 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर अशी चार दिवस होणार आहे. या यात्रेचे नामकरण त्यांनी ‘सीमांचल न्याय यात्रा’ असे केले आहे. या यात्रेच्या मार्गात ते अनेक स्थानी जाहीर सभा घेणार असून रोड शोज ही करणार आहेत. बिहारच्या सीमांचल भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी लोकसभेत ‘सीमांचल विभागीय विकास मंडळ’ाची स्थापना करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक काही काळापूर्वी सादर केले आहे. त्यावर अद्याप लोकसभेने विचार केलेला नाही. आपल्या पक्षाने बिहारमध्ये अख्तरुल इनाम या नेत्याच्या नेतृत्वात यापूर्वीच प्रचाराला प्रारंभ केला आहे. बिहारची जनता आपल्या पक्षाला विधानसभेत मोठे यश मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.