भिकारी बनून लुटणारा असद चकमकीत ठार
मथुरेत वास्तव्य : वेगवेगळ्या नावांनी अनेक शहरात कारनामे
वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात रविवारी पहाटे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत कुख्यात गुन्हेगार फती उर्फ असद याला ठार केले. ही चकमक हायवे पोलीस स्टेशन परिसरात घडली. रविवारी पहाटे डीआयजी-एसएसपी शैलेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना तो सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय असद हा आंतरराज्यीय चायमार टोळीचा म्होरक्या होता. असद याच्याविरुद्ध दरोडा, लूटमार आणि खून असे जवळपास 40 गुन्हे दाखल आहेत. तो एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार होता. पोलीस बराच काळ त्याचा शोध घेत होते. तो भिकारी असल्याचे भासवून रेकी करायचा. त्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी व लुटमारीचे कारनामे करत होता.
चायमार टोळीतील गुन्हेगार एटीव्हीच्या मागे गुन्हा करण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब परिसराला वेढा घालत दरोडेखोरांना आत्मसमर्पण करण्याचे आव्हान केले. गुन्हेगारांनी प्रत्युत्तरादाखल पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडल्या गेल्या. याचदरम्यान प्रत्युत्तराच्या कारवाईत असद गंभीर जखमी झाला. पोलिसांनी जखमी असदला ताबडतोब रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चायमार टोळीचे विविध राज्यात नेटवर्क
पोलिसांच्या नोंदीनुसार, उत्तर प्रदेश व्यतिरिक्त असदची चायमार टोळी राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्येही सक्रिय होती. त्याने या राज्यांमध्ये अनेक गुन्हेगारी घटना केल्या होत्या. हापूर जिह्यातील गढ मुक्तेश्वर येथील रहिवासी असद बराच काळ पोलिसांच्या ताब्यातून बाहेर होता. तो मथुरा जिह्यातही वॉन्टेड होता. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिसांनी या कारवाईला मोठे यश म्हटले आहे.