For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारतावरील ट्रम्प ग्रहण सुटताना

06:07 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतावरील ट्रम्प ग्रहण सुटताना
Advertisement

मागील आठवड्यातील शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून गेल्या महिन्यात संसदेने मंजूर केलेल्या नव्या निर्बंधातून रशियाला वगळले आहे. या निर्णयामुळे, मध्य पूर्वेतील तेल संकटामुळे अस्वस्थ झालेल्या आयातदार देशाच्या जिवात जीव आला आहे, तर रशियासोबत युद्धात असणाऱ्या युक्रेनचा जीव टांगणीस लागला आहे.

Advertisement

रशियावरील निर्बंध शिथील करण्यापूर्वी काही दिवस आधी ट्रम्प यांनी घोषणा केली की, त्यांचा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी एक करार झाला असून, त्यानुसार, अमेरिका रशियाकडून डिझेल इंधनाची आयात सुरु करेल. याच बरोबर अमेरिकेच्या कोषागार विभागाने, इराण सोबतच्या अमेरिका-इस्त्रायल युद्धादरम्यान वाढलेल्या ऊर्जा किमती कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून एप्रिल 2027 पर्यंत रशियन डिझेल निर्यातीवरील निर्बंध उठवले होते. यातून रशियन उत्पादकांना अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेत डिझेल इंधन विकण्याचा सर्वसाधारण परवाना मिळाला. त्यानंतर शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांनी, रशियाशी संबंधित काही नियोजित निर्बंध, ते लागू होण्याआधीच आपल्या कार्यकारी आदेशाद्वारे रद्द केले. या निर्बंधात रशियन वस्तूंवरील शुल्क व रशियन तेल व वायू खरेदी करण्यावरील दंडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे निर्बंध दिवंगत अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व गेल्या महिन्यात संसदेत द्विपक्षीय पाठिंब्याने मंजूर झालेल्या लिंडसे ग्रॅहम कायद्याचे भाग होते.

काय आहे निर्बंधांचा कायदा

Advertisement

या कायद्याची संकल्पना मांडणारे लिंडसे ग्रॅहम हे दक्षिण कॅरोलिना राज्याचे रिपब्लिकन सिनेटर होते. ते ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि रशिया विरोधात कठोर भूमिका घेणारे राजकारणी म्हणून ओळखले जात. युक्रेन विरोधात युद्ध करणाऱ्या रशियाबाबत निर्बंधात्मक उपाय सुचवून, या योजनेसाठी वर्षभरापेक्षा जास्त काळ पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांचे जुलैमध्ये निधन झाले होते. हा कायदा रशियासह इराणलाही आपल्या कार्यकक्षेत आणणारा होता. म्हणूनच त्याचे शीर्षक ‘लिंडसे ओ. ग्रॅहम रशिया व इराण निर्बंध कायदा 2026’ असे होते. कायद्याचा उद्देश रशियन सरकार, धनिक वर्ग आणि वित्तिय संस्थांना आर्थिक कोंडीद्वारे लक्ष्य करण्याचा होता. या कायद्याचे विधेयक वर्षभरापूर्वी मांडण्यात आले होते. तथापि, संसदेने 16 सप्टेंबर रोजी ते मंजूर केले. त्यानंतर दोन दिवसांनी अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी करून विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले. या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत (18 ऑक्टोबर), त्यातील तरतूदी लागू करणे राष्ट्राध्यक्षांना बंधनकारक होते. तथापि, हा कायदा त्याच्या अंमलबजावणीमध्ये राष्ट्राध्यक्षांना महत्त्वपूर्ण ‘स्वविवेकाधिकार’ देखील प्रदान  करतो. जरी आवश्यक वैधानिक निकष प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, निर्बंध अनिवार्य असले तरी, ते निर्बंध लागू करणारे अनेक निर्णय घेण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्षांची असते. जिथे संबंधित वैधानिक संज्ञांची व्याख्या केलेली नसते. तिथे हा स्वविवेकाधिकार विशेष महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तसेच ही सवलत अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय हिताची’ आहे, असे संसदेस प्रमाणित करून व त्या प्रमाणपत्राचा आधार स्पष्ट करणारा अहवाल सादर करून, या कायद्यांतर्गत निर्बंध, मर्यादा व कर्तव्ये माफ करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे कायम राहतो. नेमक्या या स्वविवेकाधिकार कलमाचा आधार घेऊन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, प्रस्तावित अंमलबजावणीतील रशियावरील निर्बंधांच्या दोन प्रमुख तरतुदी वगळल्या आहेत. त्यातील पहिल्या तरतुदीनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व रशियन वस्तूंवरील शुल्कात 500 टक्क्यांपर्यंत वाढ करणे, त्यांना बंधनकारक होते. तर दुसऱ्या तरतुदीनुसार रशियाच्या खनिज तेलाची किंवा नैसर्गिक वायूची सर्वाधिक खरेदी करणाऱ्या, पहिल्या पाच देशांमध्ये असलेल्या चीन व भारतासह इतर देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लादणेही बंधनकारक होते. सध्या तरी ते हटवल्याने, अतिरिक्त आर्थिक दबावाच्या छायेखाली आलेल्या रशियासह, त्याच्याशी व्यापार करणाऱ्या इतर अनेक देशांनी, ट्रम्प यांच्या ‘स्वविवेकास’ सलाम करत सुटकेचा निश्वास सोडला आहे.

युक्रेनला वाऱ्यावर सोडले

युक्रेन आणि त्यानंतरच्या इराण युद्धामुळे एरवी स्वयंपूर्ण मानल्या गेलेल्या अमेरिकेच्या ऊर्जा गरजाही संकटात आहेत. विशेषत: डिझेल दरवाढीचा साखळी परिणाम सार्वत्रिक महागाईत झाला आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका होण्याआधी काही दिवस, महागाईची तीव्रता वाढल्याने त्याचा फटका बसून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला संसदेवरील नियंत्रण गमवावे लागू शकते. ट्रम्प यांनी तरतुदीमागे घेण्यासाठी दिलेल्या ‘राष्ट्रीय हित’ या कारणामागे वास्तविक रिपब्लिकन पक्षाचे ‘सत्ताहित’ दडले आहे. तथापि, युक्रेनमधून या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संपूर्ण युद्ध काळात अमेरिका हाच युक्रेनचा प्रमुख पाठीराखा असल्याने, आता त्यानेच पाठीत खंजीर खुपसल्याचा विषाद युक्रेनियनांना होत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, डिझेल करार आणि नवीन निर्बंधांची माघार ही केवळ पहिली पायरी होती व ट्रम्प रशियावरील निर्बंध हटवणे सुरुच ठेवतील. सर्व काही रद्द करण्याचा, सर्व काही रोखून धरण्याचा मार्ग मला चुकीचा वाटतो. याचा निश्चित फायदा रशियाला होणार आहे. म्हणजे फक्त  त्यांनाच, यामुळे युद्ध थांबणार नाही, झेलेन्स्की यांच्यासह युरोपियन देशातील काही नेते व अमेरिकेतील ट्रम्प विरोधकांनी या निर्णयावर ताशेरे झाडले आहेत.

भारताला लाभ

आंतरराष्ट्रीय राजकारणात, बऱ्याचदा नैतिकतेपेक्षा वस्तूनिष्ठतेला अधिक महत्त्व असते. रशिया हा पूर्वीपासून भारताचा सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठादार देश आहे. मध्य पूर्वेत तणाव सुरु असताना ही मागणी वाढती आहे. कोणत्याही प्रकाराच्या निर्बंधांमुळे रशियन कच्चे तेल आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरले असते व तुटवड्यात भर पडली असती. अशावेळी 100 टक्के प्रस्तावित शुल्कमाफी हा भारतीय ऊर्जा सुरक्षेसाठी मोठा दिलासा आहे. दुसरीकडे अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याने ही शुल्क माफी भारतीय निर्यातदारांना विविध व्यापार क्षेत्रातील संभाव्य प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण देण्यासही मदत करेल. महत्त्वाचे म्हणजे यामुळे द्विपक्षीय व्यापार वाटाघाटीतील अनिश्चिततेचा एक स्त्रोत कमी होतो व भारत-अमेरिका व्यापार कराराला पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. रशियाकडून तेल खरेदी करताना आता भारताला चीनशी स्पर्धा करावी लागेल, असे दिसते. कारण मध्य पूर्वेतील त्याचाही पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचे रशियावरील अवलंबन वाढले आहे. अर्थात ट्रम्प यांच्या सवलतीमुळे रशियाने तेल उत्पादन वाढवले तर भारतासाठी ते अधिक अनुकूल ठरण्याच्या शक्यता आहेत.

 अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.