. सूर्य अस्ताला जाताना...
सह्याद्री वाहिनीवर ज्या काही जुन्या सिरीयल होत्या त्याच्या पैकी कोणतं तरी सिरीयल टायटल सॉंग होतं. त्यात पात्र कोण होती, काय होती, हे आठवत नाही. त्या वेळेचं दृश्य मात्र लख्ख आठवतं, की सूर्यास्त, सूर्यास्ताचं दृश्य तोही समुद्रकिनारा. लाल काळी होत जाणारी पश्चिम दिशा. पाहता पाहता मावळलेला सूर्य आणि त्याच्या पाठीमागे पसरत जाणारं अंधाराचं साम्राज्य. आणि दृष्टीला लख्ख दिसणारी सृष्टी काळोखाच्या साम्राज्यात विलीन होतानाचं ते अभूतपूर्व दृश्य हे खरोखरंच पाहण्यासारखं होतं. आणि ते गीत ज्या रागात बांधलं होतं तोही निश्चित सायंकालीन असावा. त्याच्यामुळे त्याचा जो काही परिणाम होता तो फार उत्कृष्ट रीतीने साधला जात होता. त्याच्यानंतर अशीच एक सिरीयल होती. त्याच्यात पंडित सुरेश वाडकर यांनी गायलेलं टायटल सॉंग होतं ‘मन सैरभैर होई’ अशा सुरुवातीचं. ‘श्वासही जीवघेणा जगणंही भासे व्यर्थ’ अशा ओळी असलेलं त्याचबरोबर एक कासव समुद्रात जातानाचे दृश्य दाखवलेलं होतं. त्या कासवाला समुद्राच्या लाटा उलथपालथ करून सोडत असतात.
आयुष्यभर पाण्यात राहणारा तो जीव समुद्राच्या दिशेने पहिल्यांदाच जात असावा. त्यामुळे समुद्राच्या गतीशी आणि त्या पाण्याशी जुळवून घेताना त्याचे होणारे हाल प्रभावीपणे चितारलेले आहेत. मराठी कथांच्या विश्वामध्ये अरविंद गोखले हे फार मोठं नाव होऊन गेलं. आधुनिक कथांचा जो पाया होता, तो ज्या चार लेखकांनी रचला त्यातले एक महत्त्वाचे लेखक म्हणजे अरविंद गोखले. यांची ‘कातरवेळ’ नावाची अतिशय सुंदर कथा अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. त्याच्या मधली ती नायिका अक्का. तिचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि ती अतिशय सुखात असते. खुश असते. आणि पहिल्यांदाच ती दीर्घ मुदतीच्या माहेरपणाला आलेली असते. त्यावेळेला सगळीकडून सुख सुख आणि सुखच असताना कातरवेळी तिला एकाएकी आपल्या शाळेच्या दिवसातला प्रियकर आठवतो. आणि मन नुसतं सैरभैर होऊन जातं. त्या कथेमध्ये ओळ आहे ‘ही सायंकाळची वेळच मुळी चमत्कारिक!’ म्हणून की काय संध्याकाळी देवासमोर दिवाबत्ती करण्याची पद्धत असते. कारण ती संध्याकाळ असते. संधिकाळ असतो. ना धड दिवस असतो ना धड रात्र असते. सूर्य मावळलेला असतो. चंद्र उगवायचा असतो. माणसाला माणूस दिसत नसतो. आणि पूर्ण अंधार झालेलाही नसतो. त्याच्यामुळे ही वेळ मोठी चमत्कारिक असते. रात्रीचं साम्राज्य म्हणजे काळोखाचं अंधाराचं साम्राज्य. स्पष्ट दिसणाऱ्या कित्येक गोष्टी दिसेनाशा होतील अशी ती वेळ! तेव्हा ती हुरहुर लावणारी असणारंच. याचा प्रभाव आणि परिणाम इतका असतो की संध्याकालीन रागांचा जो थाट आहे तो म्हणजे मारवा.
या थाटातल्या रागांना षड्ज आधारस्वर जो असतो तोच मुळी कमी प्रमाणात घ्यायची पद्धत आहे. खरंतर षड्ज हा रागाचा प्रमुख आधार असतो पण संध्याकालीन रागांचा हा आधार काढून घेतलेला असतो. कारण त्या रागांमधून त्या वेळेचा मूड दाखवायचा असतो. त्यामधून असं दाखवायचं असतं की आधार नसलेली अधांतरी असलेली ही वेळ आहे. माणसाचं मन या वेळेला बिथरते या वेळेला मनाला स्थिर राखणे ही फार मोठी कसरत असते.
असं म्हणतात की सर्वसामान्य माणसाला दिसणाऱ्या मितीपेक्षा वेगळ्या मिती यावेळी प्रभावित होत असतात. त्या मितींच्या नादाला लागून फसगत होऊ नये म्हणून देवाचं अधिष्ठान घट्ट धरून ठेवायची ही वेळ असते. दिवसभर खेळून झालेली मुलं संध्याकाळी घरी येत असतात आणि दिवेलागणीच्या वेळेला हातपाय धुवून शुभंकरोती म्हणत असतात. वेळेवर उंबऱ्याच्या आत आणणारी आणि ‘अखिल विश्वासाठी शुभं करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा’ ही प्रार्थना म्हणून घेणारी व्यक्ती म्हणजे घरातील कर्ती स्त्राr असते. तिने काही व्यवस्थित नियम घालून शिस्त लावून दिलेली असते. म्हणून घराचा कारभार व्यवस्थित चालत असतो. कुठल्याही कातरवेळी कुठल्याही अवघड वेळी घराचं सुकाणू हाती घेऊन न डगमगता घर स्थिर ठेवणे, घट्ट ठेवणे ही जबाबदारी स्त्रिया मनापासून पार पाडतात. आणि या कातरवेळी बहकणाऱ्या पावलांना बरोबर योग्य दिशेला घेऊन येतात.
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो शुभंकरोती म्हणा
असं म्हणून घरातल्या सर्व मुलांना एकत्र करून ती शुभंकरोतीला बसवते. मुलांची चंचल मनंही शुभंकरोती रामरक्षा म्हणताना एका जागी स्थिर होतात. यावेळी केलं जाणारं पाठांतर, म्हटली जाणारी स्तोत्रं ही आयुष्याच्या भक्कम पायाभरणीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. स्मरणशक्तीला चालना देणारी असतात. हे संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात आणि हेच संस्कार घेऊन मोठी झालेली मुलं जेव्हा परदेशात कानाकोपऱ्यात गेली तरीही ऐन सणासुदीच्या वेळेला त्यांची पावलं कुठेही भरकटत नाहीत. कारण घरातल्या शिकवलेल्या ओळी, त्यांचे संस्कार त्यांच्या पक्के लक्षात राहत असतात म्हणून एवढ्या सगळ्या झगमगटात सुद्धा
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ
केव्हा ती माजघरातील मंद दिव्याची वात
हे ती विसरत नाहीत. आपल्या मायभूमीचे छोटे छोटे धागे पकडून स्वत:ला तिथे रुजवत राहतात. जी कातरवेळ आपल्याला आपल्या मायभूमीत आपल्या आईजवळ असताना सुद्धा कातर करून सोडते तीच कातरवेळ परदेशातल्या व्यक्तींना तेही नवीन नवीनच तिथे गेलेलं असताना किती जड जात असेल हे त्यांनाच माहीत असतं. एक तर वातावरणही वेगळं असतं. प्रचंड प्रमाणातली थंडी तिथलं उदासीन वातावरण आणि उतरत जाणारी कातरवेळ कसं जमवत असतील ते सगळं? त्यात पुन्हा अत्यंत अनियमित असणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा. भारतीय हवामान आणि वातावरणापेक्षा खूपच वेगळं वातावरण. काही महिने संध्याकाळी चार वाजताच सूर्य मावळावा, तर काही महिने रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत संधिप्रकाश असावा. यामध्ये शरीराचं आणि मनाचं घड्याळ फार बिघडून जात असेल. त्यावेळी कातरवेळ सांभाळणारी ही स्तोत्रं फार सांभाळून नेत असतील त्यांना कदाचित.
राजकवी भा. रा. तांबे यांनी सूर्यास्त याच विषयावर ‘मावळत्या दिनकरा’ ही अप्रतिम कविता लिहिलेली आहे. जिचं पुढे जाऊन गाणं झालं आणि लतादीदींनी ते गायलं आहे. त्यातल्या ओळी मोठ्या मार्मिक आहेत. उगवत्या सूर्याला वंदन करणारे खूप असतात पण मावळत्या सूर्याला वंदन करणारे कमीच! खरंतर आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे मावळत्या सूर्यालाही वंदन करून संध्यावंदन करून अर्घ्य देण्याची जुनी पद्धत होती. पण ती आता लुप्त झालेली आहे भा. रा. तांबे मात्र हे विसरत नाहीत. ते सहज म्हणून जातात
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा
हे वास्तव शिकवणारी ती कातरवेळ. सूर्य अस्ताला जातानाही शिकवून जातो ते हेच!
अॅड. अपर्णा परांजपे प्रभु