यादी प्रसिद्ध होताच अनेकांचे धाबे दणाणले
घोटाळ्याचा आकडा 200 कोटीपर्यंत ? : अडकलेल्यांना वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड
पणजी /विशेष प्रतिनिधी
नोकरीसाठी पैसे याअंतर्गत परब यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविल्यानंतर ज्या 44 जणांची यादी पोलीस स्थानकावर पाठविली ती यादी दैनिक ‘तरुण भारत’ मधून जाहीर झाल्यानंतर शनिवारी माशेल, प्रियोळ, म्हार्दोळ या भागात एकच गोंधळ उडाला व वृत्तामुळे अनेकांचे धाबे दणाणले. अनेकजण आपली नावे उघड होऊ नये यासाठी बचावाचे धोरण राबवीत आहेत
दैनिक ‘तरुण भारत’मध्ये यादी प्रकाशित झाल्यानंतर बराच गोंधळ उडाला आणि अनेकजण पुढील यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश होऊ नये यासाठी दिवसभर धावपळ करीत असल्याचे वृत्त आहे. अनेकांनी ‘तरुण भारत’चे आभार मानले कारण हा घोटाळा बराच खोलवर आहे आणि प्रियोळमधून डिचोली तालुक्यापर्यंत त्याचे कनेक्शन पोहोचलेले आहे व अनेक मोठे मासे यामध्ये असल्याचा संशय माशेलमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे होण्याची शक्यता कमीच असल्याने अनेकजण समोर येण्यास तयार होत नाही. मात्र या प्रकरणातून भलतेच काही उद्भवेल याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत या प्रकरणात शिकारी ठरलेल्यांनी व्यक्त केली.
सरकारने या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरीत आहे. अनेक जणांनी घाबरून जाऊन पोलीस स्थानकात अद्याप तक्रार केलेली नाही मात्र हा घोटाळा केवळ वीस-पंचवीस कोटींचा नसून तो 100 ते 200 कोटी ऊपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. अद्याप या प्रकरणातील पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला नाही. कदाचित पोलीस त्याच्या मुळापर्यंत जातील की नाही हे समजत नाही मात्र यामध्ये अनेक मोठे मासे अडकलेले आहेत, त्यांना वाचविण्यासाठी देखील काही राजकीय नेत्यांची धडपड सध्या चालू झाली आहे त्यासाठी फिल्डिंग लावण्याचे काम चालू आहे. सध्या जे जाहीर झाले ते छोटे मासे आहेत.