For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्ण दिसत नाही असे होताच दारूक जड, मूढ झाला

06:20 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्ण दिसत नाही असे होताच दारूक जड  मूढ झाला
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

भगवंत जराव्याध्याला म्हणाले, तुला माझे दर्शन घडले असल्याने तू कितीही स्वर्गसुख उपभोगलंस तरी तुझे पुण्य क्षीण होणार नाही. तुझा उद्धार होणार हे निश्चित आहे, तेव्हा आता मनात कोणतीही शंका कुशंका आणू नकोस कारण मी सांगितलेल्या गोष्टीत मिथ्या किंवा तुझी दिशाभूल करणारे काहीही नाही. तू कायमचा संतुष्ट होणार आहेस. इतर लोकांप्रमाणे मी नुसत्या गोडगोड गप्पा मारणारा वाटलो का तुला? तू तसा विचार करत असशील तर तुला चूक म्हणता येणार नाही कारण बहुतांशी लोक असेच बोलतात पण माझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे. त्यांच्याप्रमाणे मी नुसते बोलणारा नसून बोलल्याप्रमाणे करून दाखवणारा आहे. तुला मी बोलल्याप्रमाणे आत्तापासूनच अक्षय सुख भोगायला नक्की मिळेल. आपल्या आज्ञेचे उल्लंघन कुणीच करू शकत नाही असे श्रीकृष्णनाथ जराव्याधाला समजावून सांगत असतानाच चमत्कार घडला आणि श्रीकृष्णांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे दैदिप्यमान विमान येऊन हजर झाले. भगवंत बोलल्याप्रमाणे विमान आलेले पाहून जराव्याधाचा आनंद गगनात मावेना. त्याने कृष्णाला तीन प्रदक्षिणा घातल्या, साष्टांग नमस्कार केला आणि विमानात जाऊन बसला. जराव्याध विमानात बसल्याबरोबर विमानाने उंच उडून इंद्र, चंद्र, ग्रहगणाच्या मार्गाने जाऊन अक्षय सुख भोगण्यासाठी व्याधाला स्वर्गभुवनात नेऊन सोडले. कृष्णकृपेचा पूर्ण अनुभव व्याधाने घेतला. ज्याने पूर्ण अपकार केला त्यावर आपण उपकार करावा हे शांती आणि ज्ञानाचे लक्षण आहे ते श्रीकृष्णांनी त्यांच्या वर्तनाने दाखवून दिले. ब्रह्मज्ञान सांगणारे बरेच असतात. ते मोठमोठ्या, लंब्याचवड्या बाता मारतात पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की, मागे सरकतात. तुकाराम महाराजांनी हे बरोबर जाणले होते म्हणून ते म्हणतात, बोले तैसा चाले त्यांची वंदिन पाऊले कारण बोलल्यानुसार चालणारे फारच थोडे म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात. श्रीकृष्णनाथ त्यापैकीच एक होते. बोलल्याप्रमाणे वागून त्यांनी व्याधाचा सांगून सवरून उद्धार केला. सर्व कुळाचे निर्दलन झाल्यावर श्रीकृष्णाला कशाचाही मोह राहिला नव्हता. ज्या व्याधाने त्यांना बाण मारला होता त्या व्याधाचाही त्यांनी उद्धार केला. अशाप्रकारे बोललेला शब्द खरं करून ते ध्यानस्थ बसलेले होते. इकडे समुद्राच्या तीरावर त्यांचा सारथी दारूक रथ घेऊन उभा होता. त्याला श्रीकृष्णनाथ कुठे दिसले नाहीत. तो त्यांच्यावर मनापासून प्रेम करत असे. त्यामुळे कासावीस होऊन तो त्यांच्या शोधार्थ निघाला. श्रीकृष्णाच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत तो सर्वत्र त्यांचा शोध घेऊ लागला. तोवर त्याला भगवंतांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळांचा सुवास येऊ लागला. त्या गंधाच्या वासाच्या अनुरोधाने तो त्यांच्या शोधार्थ पुढेपुढे जाऊ लागला. आणखीन थोडे पुढे गेल्यावर त्याने महातेजाचा प्रकाश बघितला. तसेच पुढे गेल्यावर धगधगीत तेजाचा गोळा असलेले, अश्वत्थातळी वीरासन घालून बसलेले घनसावळे श्रीकृष्ण दारूकाच्या दृष्टीस पडले. त्यांच्या हातात दिव्य आयुधांचा मेळा होता. त्यांना बघितल्याबरोबर गडबडीने दारूक उडी मारून रथाखाली उतरला. त्याचे श्रीकृष्णावरील आत्यंतिक प्रेमापोटी त्याने धावत जाऊन श्रीकुष्णाचे चरण पकडले. बराच वेळ श्रीकृष्णांना न बघितल्याने त्याची स्थिती अत्यंत शोचनीय झाली होती. त्याच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या. अंग थरथरा कापत होते. तो म्हणाला शार्ङ्गधरा तुम्ही दृष्टीस पडला नाहीत म्हंटल्यावर डोळ्यापुढे अंधार दाटून आला. तुमचे चरण दिसेनासे झाल्यावर अष्टदिशा अंधाराने भरून गेल्याप्रमाणे झाले. ज्ञानालाच जर विवेकाने सोडले तर कणभरसुद्धा सुख प्राप्त होणार नाही त्याप्रमाणे तुम्ही दिसत नाही असे होताच मी जड, मूढ झालो.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.