2 वर्षाच्या मुलाला मोबाइल मिळताच.....
मागविले 5 हजार रुपयांचे चीजबर्गर 1200 रुपयांची टिप देखील दिली
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका दोन वर्षीय मुलाने मोबाइलवर खेळता-खेळता अनेक बर्गरची ऑर्डरच दिली आहे. मुलाने डोरडॅश नावाच्या एका फूड डिलिव्हरी ऍपचा वापर करत मॅकडोनाल्ड्स आउटलेटमधून 31 चीजबर्गर मागविले. मुलाने sकवळ बर्गरची ऑर्डर दिली नव्हती तर डिलिव्हरी बॉयसाठी टिपही जोडली होती.
किंग्सव्हिले येथे राहणाऱया केल्सी बुर्खाल्टर गोल्डन या कॉम्प्युटरवर काम करत असताना त्यांचा मुलगा फोन अनलॉक करून खेळू लागला. तो मोबाइलद्वारे स्वतःची छायाचित्रे काढतोय असे केल्सी यांना वाटले, परंतु त्यांनी मागे वळून पाहिल्यावर त्याने मोबाइलवर खेळताना ऑर्डर केल्याचे आढळून आले.
चीजबर्गर फुकट वाटण्याची वेळ
डोरडॅशचा मेसेज पाहून मला धक्का बसल्याचे गोल्डन यांनी सांगितले. तुमची ऑर्डर अत्यंत मोठी असल्याने त्याकरता काहीचा अधिक वेळ लागणार असल्याचे मेसेजमध्ये नमूद होते. माझ्या मुलाने 31 चीजबर्गरची ऑर्डर केली होती असे त्यांनी म्हटले आहे. मुलाने सुमारे 5 हजार रुपयांचे बर्गर मागविले होते. तसेच त्याने यात टिपचे 1200 रुपयेही जोडले हेते. परंतु त्याच्या आईने ऑर्डर रद्द करणे किंवा मुलाला ओरडण्याऐवजी बर्गर लोकांमध्ये फुकट वाटण्याचा निर्णय घेतला.
पोस्टद्वारे केली विचारणा
केल्सी यांनी ‘किंग्सव्हिले कम्युनिटी हेल्प’ नावाच्या एका फेसबुक ग्रूपवर मुलाचे आणि बर्गरचे छायाचित्र पोस्ट केले. “माझ्याकडे मॅकडोनाल्ड्सचे 31 चीजबर्गर असून ते देखील मोफत. जर कुणाला हवे असतील तर त्याने येऊन घेऊन जावेत. माझा 2 वर्षांचा मुलगा डोरडॅशद्वारे ऑर्ड करणे जाणतो’’ असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले होते. काही मिनिटांमध्येच अनेक स्थानिकांनी त्यांच्याकडून बर्गर घेतले. तर काही जणांनी कॉमेंट करून त्यांना फोन आणि ऍप प्रोटेक्ट करण्याचा सल्ला दिला.