For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनातलं साधे तर......

06:57 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनातलं साधे तर
Advertisement

जुन्या काळातल्या व्यक्तींनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे संतती, संपत्ती कशाकशाला कमी नसते. परंतु काळाचा फासा उलटतो आणि त्या कुटुंबाची इतकी मोठी परवड होते की ती बघताना काळ ही किती मोठी ताकदवान गोष्ट आहे हे आपल्याला कळून जातं. त्यांनी त्यावेळेला मनात बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या असतात. त्यातल्या किती गोष्टी होतात आणि किती होत नाहीत हे त्या फिल्ममध्येच पाहणं जास्त मनोरंजक ठरेल. खरं तर तो सिनेमा बघतानाही ज्याचं काळीज जिवंत आहे त्या कुठल्याही माणसाला त्या फिल्ममध्ये चित्रित केलेली परवड बघून अतिशय दु:ख झाल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

पूर्वीच्या लोकांची एक म्हण आहे. मनातलं साधे तर दळीद्र का बाधे? याचा अर्थ असा की मनातल्या ज्या गोष्टी योजलेल्या असतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी साधतच नसतात. पण जर का मनातल्या सगळ्या गोष्टी साधल्या असत्या तर माणसाला दारिद्र्या नावाचा प्रकार बाधला असता का? असा त्याचा शब्दश: अर्थ आहे. म्हणजे काय? तर योजलेल्या सगळ्या गोष्टी साधल्या तर मुख्य म्हणजे माणसाकडे विवंचना, दारिद्र्या राहणारच नाही. माणसाच्या जन्माला आल्यानंतर ‘सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे’ असं तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवलेलं आहे.

परीक्षा जवळ आल्या, की माझी एक मैत्रीण म्हणायची. ‘परीक्षा जवळ आल्या ना की मला कावळ्याचासुद्धा हेवा वाटतो.’ का? तर त्याला परीक्षा द्यावी लागत नाही आणि आपल्याला परीक्षा द्यावी लागते. मला त्यावेळीही हसू यायचं की ही किती वेडी आहे! कावळ्याला परीक्षा द्यावी लागत नाही म्हणून त्याचा हेवा करण्यापेक्षा कावळ्याला नुसत्या जगण्यासाठी किती मेहनत करावी लागते याचा विचार कोण करणार? त्याला इतर शत्रूंपासून भय किती असतं, नुसते दोन पाय आणि एक चोच याचा आधार घेऊन त्याला घरटं बांधायचं असतं, मादी शोधायची असते, पिल्लं जन्माला घालायची असतात. त्यासाठी अंडी उबवत बसावं लागतं, चारापाणी आणावं लागतं म्हणजे प्रत्येक पक्षांचं, प्रत्येक प्राण्याचं स्वत:चं आयुष्य असतंच आणि ते फार जास्त कठीण असू शकतं. काम हे प्रत्येकालाच करावं लागतं. रोज उठून आपली अंडी शिकार होण्यापासून वाचवणे ही काय थोडी परीक्षा असते? आणि ती नाहीच जमली तर कित्येकवेळा दुसरे शत्रू पक्षी येऊन ती अंडी फोडून जातात. साप येऊन ती अंडी घेऊन जातात. कधी कधी नैसर्गिक आपत्तीत अंडी पडून उद्ध्वस्त होतात. स्वत:चं बाळ अस्तित्वात न राहणं हे केवढं मोठं दु:ख आहे! ते त्या कावळ्याला कावळीला भोगावं लागतंच की. त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने सुरुवात करणे ही काय थोडी परीक्षा असते? पण प्राण्यांना काय किंवा पक्ष्यांना काय, बिचाऱ्यांना भाषाच अवगत नसते. त्यांचा मेंदू एवढा विकसित नसतो. त्यामुळे त्यांना एवढे विचार करायला जमतही नसतील. अर्थात माणसाचं आयुष्य आणि प्राण्याचं आयुष्य या मुळात दोन असमान गोष्टी आहेत. त्यांची तुलना नको त्या पद्धतीने करणे हे चुकीचं राहील. परंतु त्यांची तुलना करायचीच झाली तर ती अशी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करावी लागेल. आता वळू माणसाच्या आयुष्याकडे. ‘वक्त’ या नावाची अत्यंत सुंदर जुनी फिल्म होती. आता त्या फिल्मला सत्तर ऐंशी वर्षे सहज झाली असतील. बलराज सहानी यांची त्याच्यात प्रमुख भूमिका होती. ‘ए मेरी जोहराजबीं’ हे त्यातलं आजही प्रसिद्ध असलेलं गाणं. ते लोकप्रिय आहेच. आता त्याच्या नवीन नवीन व्हर्जन पण येत आहेत. पण या गाण्यानंतरच त्यांच्या आयुष्यातला खरा यु टर्न सुरू होतो. अत्यंत श्रीमंत आणि हवेलीवाला मोठा धनवान माणूस. एका माझ्या मुलाला मी डॉक्टर करेन, एकाला इंजिनियर करेन अशी स्वप्नं बघणारा माणूस, त्याच्यासोबत असणारे तितकेच धनिक नातेवाईक, मित्रमंडळी, गोतावळा सगळं काही त्याच्याकडे असतं. जुन्या काळातल्या व्यक्तींनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे संतती, संपत्ती कशाकशाला कमी नसते. परंतु काळाचा फासा उलटतो आणि त्या कुटुंबाची इतकी मोठी परवड होते की ती बघताना काळ ही किती मोठी ताकदवान गोष्ट आहे हे आपल्याला कळून जातं. त्यांनी त्यावेळेला मनात बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या असतात. त्यातल्या किती गोष्टी होतात आणि किती होत नाहीत हे त्या फिल्ममध्येच पाहणं जास्त मनोरंजक ठरेल. खरं तर तो सिनेमा बघतानाही ज्याचं काळीज जिवंत आहे त्या कुठल्याही माणसाला त्या फिल्ममध्ये चित्रित केलेली परवड बघून अतिशय दु:ख झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकूण त्या गोष्टीतून घ्यायचा बोध एवढाच आहे की आपण एक ठरवतो आणि दैव दुसरंच काहीतरी ठरवत असतं. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ! काही वेळेला कोणाचाच दोष नसतो परंतु खूप मोठे मोठे प्रसंग आयुष्यात घडून जातात. मनुष्यस्वभावाप्रमाणे आपण त्यात चूक कोणाची हे शोधत राहतो. आपल्याला आपलं वैफल्य काढायला, झाल्या गोष्टींचं खापर फोडायला कोणीतरी हवं असतं. खरंतर हेही चूक म्हणता येत नाही परंतु त्यातून निष्पन्न काही होणार नसतं, हे त्या वेळेला आपल्याला भान राहात नसतं.

Advertisement

‘धूल का फूल’ हाही एक सिनेमा तसाच. किंबहुना जुन्या काळात माणसाच्या दैवाने त्याच्यावर सतत केलेली मात हा सगळ्या फिल्मी जगताचा आवडीचा विषय असल्यासारखे भरपूर सिनेमा त्या विषयावर निघत आले. त्यामध्ये एखादा अतिशय गरीब, भूमीहीन असलेला माणूसही दैवे कोणाकडे तरी दत्तक जातो आणि आयुष्यात कधी पाहिली नसेल एवढी धनसंपत्ती त्याच्या नावावर होते. त्याचं आयुष्य बदलून जातं असंही दाखवण्यात येत असे. परंतु एकूण भर या गोष्टीवर होता की देव आणि दैव हे माणसापेक्षा कधीही ताकदवानच असतात. माणसाच्या कष्टाला, त्याच्या प्रयत्नांना महत्त्व देणारे सिनेमे आले नाहीत असं नव्हे. परंतु सुरुवातीचा सगळा भर हा देव आणि दैव यांचं प्राबल्य दाखवण्यातच गेलेला असावा असं म्हणायला वाव आहे. नंतर फिल्मचे विषय बदलत गेले आणि माणसाचे प्रयत्न दैवाशी त्याने दिलेली टक्कर, मानवी मूल्यं, त्याचं झगडणं आणि प्रयत्नाने परिस्थितीवर केलेली मात, हे विषयही पुढे येऊन चर्चिले जाऊ लागले. मग साहजिकच चित्रपटसृष्टी व त्याचा परिणाम होऊन ‘दो आँखें बारा हाथ’ सारखे पिक्चर येणंही सुरू झालं. परंतु अगदी आजच्या काळातही ‘कहानी मे ट्विस्ट’ याला प्रचंड महत्त्व आहे. मुळात हे ‘कहानी मे ट्विस्ट’ आलं कुठून? तर दैवाला आपल्या आयुष्याशी खेळायची मोठी खोड असते. आपल्या आयुष्याच्या सरधोपट चाललेल्या वाटेवर आपण स्वत: कधी कल्पनाही केली नसेल असं भलतंच वळण येतं असं बहुतेकांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडतंच असतं. माणसाला सगळ्यात जास्त वैचित्र्य जर कशाचं वाटत असेल तर ते या गोष्टीचं. मग ते चांगलं वळण असो किंवा वाईट वळण असो. परंतु कथेचा पायाच बदलून टाकण्याचं त्या वळणात सामर्थ्य असतं. त्यामुळे असा ट्विस्ट दाखवल्यानंतर प्रेक्षक खेचले जातात. गर्दी जमते आणि नाटक, सिनेमा, पुस्तकं दीर्घकाळ चालतात बेस्टसेलर होतात. कोणत्याही कलाकृतीचं जेव्हा मनुष्याला स्वत:च्या आयुष्याशी साधर्म्य वाटतं, जेव्हा तो रिलेट करतो तेव्हा ती लोकप्रिय होते. यशाचं हे गमक आहे. परंतु प्रत्यक्ष या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यावेळेला मात्र माणसाला ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ असं म्हणायची वेळ येते. मनातलं साधे तर दळीद्र कां बाधे? म्हणतात ते उगीच नाही.

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.