For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागरिक म्हणून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची

11:13 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागरिक म्हणून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची
Advertisement

पर्यावरणतज्ञ, अभ्यासकांच्या मते पृथ्वीची स्थिती चिंताजनक : पर्यावरण विषय अत्यंत गहन

Advertisement

बेळगाव : पृथ्वीची स्थिती चिंताजनक आहे, हे पर्यावरणतज्ञ, अभ्यासक सांगत आहेत. देशभरातच जंगल संपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. अशा वेळी पर्यावरण वाचवा म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा इतकीच सीमित संकल्पना सर्वसामान्यांना ज्ञात आहे. फार फार तर प्लास्टिकचा कमी वापर करणे आवश्यक आहे, याची जाणीवही त्यांना आहे. परंतु, पर्यावरण हा विषय अत्यंत गहन आणि अभ्यास करण्याजोगा आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही ठरावीक संघटना, संस्था किंवा तज्ञांची नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? असा प्रश्न कोणालाही पडेल. परंतु, सार्वजनिक किंवा पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार करण्याआधी आपण  स्वयंपाकघरापासूनच पर्यावरण संरक्षणाचा विचार करून तो कृतीत आणू शकतो. हे पर्यावरण कसे आहे? त्यासाठी आपण काय करू शकतो? हे आपण पाहू.

घरातील सांडपाण्यामुळे प्रदूषण

Advertisement

आपल्या नदीतील 70 टक्केपेक्षा अधिक प्रदूषणाचा वाटा घरातून जाणाऱ्या सांडपाण्याचा आहे. हे सांडपाणी कशामुळे प्रदूषित होते? तर दैनंदिन घरगुती उत्पादनातील घातक रसायनांमुळे सांडपाणी प्रदूषित होते. टूथपेस्ट, साबण, शाम्पू, डिटर्जंट, सौंदर्य प्रसाधने यासारख्या दैनंदिन घरगुती उत्पादनांमध्ये सोडियम लॉयरल, सल्फेट, ट्रायक्लोजन, सोडियम फ्लोराईड, कोकामाईड डायथेनॉलामाईन व तत्सम घातक रसायने व वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये आणि नाशके असतात. ही घातक रसायने आपण रोज सांडपाण्यातून नाल्यामध्ये व पर्यायाने नदीत व इतर जलस्रोतांमध्ये तसेच जमिनीत लोटत असतो. नदीचे पाणी निसर्गचक्रात सतत शुद्ध होते. पण मानवनिर्मित अशा विषद्रव्यांचे नदीत शुद्धीकरण, विघटन होत नाही. ती कायमस्वरुपी नदीत राहतात. नद्या आणि ओढ्यांप्रमाणे भूजलांवर अवलंबित विहिरी आणि विंधन विहिरी तसेच इतर भूगर्भातील जल प्रदूषित होते. हे विषद्रव्ययुक्त सांडपाणी मातीत झिरपून भूजलात मिसळते व भूगर्भातील पाणी विषयुक्त होते. या प्रदूषित पाण्याचा उपसा शेतीसाठी केल्याने पाण्यातील घातक रसायने पिकांमध्ये शोषली जातात आणि अशाप्रकारे ती अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला हानी पोहोचते. हेच पीक, धान्य, फळे, भाज्या आपण अन्नाद्वारे ग्रहण केल्याने पोटाचे, त्वचेचे, श्वसनाचे विकार तसेच कर्करोग याची शक्यता वाढते.

पाणी शुद्ध ठेवण्याचे निसर्गचक्र

नदीचे पाणी शुद्ध ठेवण्याची निसर्गाची स्वतंत्र आणि सुंदर यंत्रणा आहे. तशीच यंत्रणा अन्य जलस्रोतांमध्येही आहे. जमिनीतील वाळू आणि माती गाळण यंत्राचे काम करतात. शुद्ध पाण्याचा हा प्रवाह आपण आपल्या घरामधून फिरवतो. पण घरातून जाणारे पाणी मात्र शुद्ध नसते. हे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून आपण कोणतीही काळजी घेत नाही. पण पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत, हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. आपण आपल्या कृतीमध्ये बदल करू शकतो. हे बदल कसे करता येतील, ते पाहूया.

कृती क्र. 1- आपण उठल्या उठल्या बेसिनकडे ब्रशवर कमीत कमी 2 ते 5 ग्रॅम पेस्ट घेऊन दात घासून बेसिनमध्ये थुंकतो. या पेस्टमध्ये वेगवेगळी सहा रसायने तरी नक्की असतात. साधारण एका महानगराची लोकसंख्या 40 लाख धरली तर त्यापैकी 30 लाख लोक टूथपेस्ट वापरतात. म्हणजेच 120 लाख ग्रॅम रसायने आपण रोज विसर्जित करतो.

यावर उपाय म्हणजे नुसत्या ब्रशने जरी दात साफ केले तरी दातांसाठी ते आरोग्यदायी आहे. याचा अर्थ टूथपेस्ट टाळता येते. पण वर्षानुवर्षाची सवय बदलणे शक्य नसेल तर कमीत कमी अर्धा ग्रॅम टूथपेस्ट आपण वापरू शकतो. याशिवाय दंत मंजन, नीम, बाभूळ यांच्या काड्या दात घासण्यासाठी वापरल्यास जैविक विघटन शक्य होते. सर्वात चांगला शास्त्राrय उपाय म्हणजे दात एक ते तीन टक्के प्रमाणित हायड्रोजन पेरॉक्साईडने घासल्यास कीड मरते व या पाण्याचे विघटन पाणी आणि ऑक्सिजनमध्ये होते.

कृती क्र. 2- महानगरात पुरुषांची संख्या 20 लाख धरली तर रोज दाढीसाठी क्रीम, जेल, पेस्ट, साबण याचा वापर होतो. त्यामध्ये 8 ते 10 रसायने आहेत. दाढीसाठी 5 ते 8 ग्रॅम प्रसाधन लागते. म्हणजेच साधारण 75 लाख ग्रॅम दाढीची रसायने आपण सांडपाण्यात सोडतो.

उपाय- शास्त्राrयदृष्ट्या गरम पाण्याने तोंड धुतल्यावर चेहऱ्यावरचे केस मऊ होतात. अशा वेळी वापरत असलेले ब्लेड्स आधुनिक असतील तर साबणाशिवाय दाढी होऊ शकते व कमीत कमी साबण फेस करण्यासाठी वापरला तर उत्तम. ज्यांना शक्य असेल त्यांनी लोणी किंवा कोरफडीचा गर चेहऱ्यावर फिरवून दाढी केल्यास तो साबणाला पर्याय ठरतो.

कृती क्र. 3- स्नान करणे- महानगरात 30 लाख स्त्राr पुरुष दररोज आंघोळ करत असतील तर वापरल्या जाणाऱ्या साबणांमध्ये सुगंधी रसायने, रंग, सल्फेट, सोडियम धातू, डिटर्जंट्स असतात. साधारण 4 ते 8 ग्रॅम साबण आंघोळीला घेतल्यास 30×4 असे धरल्यास 120 लाख ग्रॅम रसायने आपण विसर्जित करतो. याशिवाय शाम्पूमध्ये 6 ते 10 रसायने आहेत. याच धर्तीवर आपण किती ग्रॅम रसायन विसर्जित करतो, याचा अंदाज येईल.

उपाय- आंघोळीसाठी लागणाऱ्या साबणाऐवजी आपण प्युमिक स्टोन वापरू शकतो. याच्या स्पर्शाने रंध्रे मोकळी होतात. शिकेकाई, उटणे, रिठा, मुलांसाठी दूध आणि साय, डाळीच्या पिठाचा उपयोग करता येतो.

कृती क्र. 4- स्नानानंतर कपडे धुणे नैसर्गिकच. धुण्याच्या साबण पावडरीमध्ये अखाद्य तेल, फॉस्फेट्स, कॉर्बोनेट्स, रंग, द्रव्य, वासद्रव्ये असतात. डाग काढण्यासाठी अॅसिड रसायनही असते.

उपाय- याला रिठा, शिकेकाई, व्हिनेगर याचा उपयोग वॉशिंग मशीनमध्ये किंवा हाताने धुण्यासाठी करून आपण नैसर्गिकरीत्या कपडे स्वच्छ करू शकतो.

कृती क्र. 5- रोजच्या रोज सकाळी व रात्री साधारण 30 लाख घरात स्वयंपाक होतो. यात चहा, कॉफी, नाष्टा, जेवण धरल्यास टॅनिन, कॅफिन, पॉलिफिनाल्स, रंगद्रव्ये, अखाद्य तेले, फॅटी अॅसिड्स, मसाल्यातील रसायने,भाजीपाल्यावरची कीटकनाशके यांचा समावेश असतो.

उपाय- हे पाणी पुनर्वापरासाठी प्रक्रिया करून वापरात आणणे शक्य आहे.

कृती क्र. 6- भांडी घासणे- भांड्यांसाठीच्या साबणामुळे रसायनयुक्त पाणी आपण बाहेर सोडतो. तसेच कीटकनाशकांसाठी वेगवेगळे स्प्रे फवारतो.

उपाय- यासाठी तिखट, लसूण, कांदा, पालक या पदार्थांचा वापर करता येईल. निमतेल, गवती चहायुक्त तेल अंगाला लावू शकतो. कापराची वडी मॅटच्या जागी लावून डास पळवू शकतो.

कृती क्र. 7- देवपूजा- आपण दररोज देवापुढे उदबत्ती लावतो. धूप, कापूर, उदबत्ती यामध्ये नायट्रेट्स, थॅलेट्स, डिझेल, केरोसिन यांचा वापर असतो. माणशी 2 ग्रॅम धरल्यास 75 लाख ग्रॅम रसायने हवेत सोडली जातात.

उपाय- नैसर्गिक पद्धतीचा वापर करून केलेले धूप, कापूर यांचा तसेच अखाद्य तेलाचा वापर दिवा लावण्यासाठी करायला हवा.

कृती क्र. 8- व्यसन- पान, गुटखा खाणारी व थुंकणारी माणसे यांचा तर विचारच केला नाही तर बरे. टॅनिन, निकोटीन, चुना, सुगंधी द्रव्ये यामुळे जवळपास 50 लाख ग्रॅम रसायने विसर्जित केली जातात.

उपाय- आयुष्यालाच घातक असणाऱ्या या व्यसनांचा वापर टाळल्यास व जनजागृती केल्यास हे थांबवता येईल. उपरोक्त सर्व प्रसाधनांचा, साबणांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी आत्मपरीक्षण करून या गोष्टींचा वापर थांबवल्यास खऱ्या अर्थाने कृतिशील पर्यावरणाकडे आपण वाटचाल करू शकतो. फक्त गरज आहे ती प्रयत्नांची आणि कृतिशीलतेची.

भारतातील चार प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये समावेश

डॉ. प्रमोद मोघे यांचे शालेय शिक्षण बेळगावमध्ये झाले. पीएचडीनंतर पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे शेती रसायने, कीड, कीटकनाशके, तणनाशके, औषध निर्मिती, सूक्ष्म रसायन निर्मिती, कापड, कागद, उद्योगासाठीचे नवे रंग, रंग रसायने, नैसर्गिक रंग, सुगंधी द्रव्ये, खाद्यतेले, पदार्थ, हवा, पाणी प्रदूषण, निर्मूलन या क्षेत्रात राष्ट्रासाठी बहुमोल संशोधन केले व या क्षेत्रात ऐंशीच्या वर प्रक्रिया विकसित केल्या. त्यांच्या नावावर 40 देशी व विदेशी पेटंट्स आहेत. त्यातील 7 भारतातील प्रदूषणावर आहेत. संशोधन क्षेत्रासाठी त्यांना 7 पुरस्कार, 22 सन्मानपदके, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ‘बेरी-बुऱ्हाणी पर्यावरण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. जो आजवर भारतातील फक्त चार शास्त्रज्ञांनाच लाभला आहे.

-डॉ. प्रमोद मोघे

Advertisement
Tags :

.