मनोविकासचे अरविंद पाटकर यांचे निधन
सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण-पाट येथील मूळ रहिवासी आणि पुणे येथील मनोविकास प्रकाशनचे अरविंद घनःश्याम पाटकर (७२) यांचे गुरुवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. पाटकर यांनी सुरुवातीला मुंबई येथे गिरणी कामगार चळवळीत काम केले. ते सुमारे ११ वर्षे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्याकाळी रशियातून भारतात प्रोग्रेसिव्ह प्रकाशनची पुस्तके यायची. ती मराठीतूनही असायची. त्याचे वितरण पाटकर करायचे. १९८४ मध्ये ते पुस्तक प्रकाशन व्यवसायात उतरले. तर १९८५ मध्ये त्यांनी स्वतःची मनोविकास प्रकाशन संस्था काढली. अण्णाभाऊ साठे-गाणी आणि पोवाडे हे पहिले पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. वैचारिक आणि वैज्ञानिक, अंधश्रद्धा निर्मुलनविषयक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. त्यांनी कधीही धार्मिक किंवा अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारी पुस्तके प्रकाशित केली नाहीत. त्यांचे मुलगे आशिष आणि अमोल हा व्यवसाय सांभाळत आहेत.