अरविंद केजरीवालांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांना केले सतर्क
भाजप काहीही करू शकतो
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी संबोधित केले तसेच आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. भाजप निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वकाही करणार आहे. भाजप पूर्ण शक्तिनिशी प्रचार करणार आहे, परंतु भाजपला विजयापासून रोखण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. आम आदमी पक्ष हा देशाच्या राजकारणातील आशेचा किरण आहे. दिल्लीत सुरू असलेली कामे बंद होणार नाहती हे आम्हाला सुनिश्चित करावे लागणार असल्याचा दावा केजरीवालांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला आहे.
मागील दोनवर्षांमध्ये आम्ही अत्यंत अवघड काळाला सामोरे गेलो आहोत, परंतु देव सर्वात प्रिय भक्ताचीच परीक्षा पाहत असतो. देवाने राजा हरिश्चंद्राची कठीण परीक्षा घेतली होती. आतापर्यंत पूर्ण पक्षाने अत्यंत शूरपणे सर्व अडचणींना तोंड दिले आहे. आमच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु याच्या उलट आमचा पक्ष अधिक मजबूत झाला असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.