For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग

06:12 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चीन वारंवार अरुणाचल प्रदेशवर आपला दावा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, सातत्याने खोटे दावे केल्याने तो भाग चीनचा कधीच होणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असून तो भारतापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताने केले आहे.

गेल्या सोमवारी चीनी सेनेच्या प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेश चीनचा असल्याचे विधान केले होते. अशी धादांत खोटी विधाने करुन काहीही उपयोग होणार नाही. भारताचा अरुणाचल प्रदेवरचा अधिकार अबाधित राहणार आहे. चीनने विनाकारण  बिनबुडाचे दावे करु नयेत, असे स्पष्ट प्रतिपादन भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.

Advertisement

भारताचा अविभाज्य भाग

अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग होता, आहे आणि भविष्यातही राहील. या राज्यातील लोकांसाठी केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ या लोकांना मिळतच राहणार आहे. कोणीही त्यांना हा लाभ उठविण्यापासून रोखू शकत नाही. कोणत्याही इतर देशाने अरुणाचल प्रदेशकडे वक्रदृष्टीने पाहू नये. त्याचा उपयोग होणार नाही. अरुणाचल प्रदेशात भारताची संरक्षण व्यवस्था भक्कम असून आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास आम्ही समर्थ आहेत, अशा अर्थाचे वक्तव्यही जयस्वाल यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अनेक प्रकल्पांचा शुभारंभही केला होता. चीनने त्यांच्या या दौऱ्याला तीव्र आक्षेप घेतला होता. भारतानेही जोरदार प्रत्युत्तर देत हा आक्षेप फेटाळला होता. त्यानंतर गेल्या सोमवारी पुन्हा चीनच्या सेना प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेश हा चीनचा एकसंध भाग असल्याची दर्पोक्ती केली होती. त्यामुळे भारतानेही चीनला त्याच्याच भाषेत पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे.

Advertisement
Tags :

.