अंधारीप्रकरणी अरुण कापसेला पुन्हा अटक
मेढा, कास, कुडाळ :
अंधारी (कास, ता. जावली) येथे संजय शेलारचा खून हे महाराष्ट्रात गूढ बनले होते. खूनाच्या आरोपीला न्यायमूर्तींनी तसेच सोडल्यामुळे हा प्रकार आणखीनच लक्षवेधक बनला होता. कामगाराच्या मृत्यूसाठी करोडोंचा मालक गायब झाल्याने हे प्रकरण सातारा पोलिसांसाठी लक्षवेधक होते. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक म्हणून मुखवटा मिरवणाऱ्या अरुण कापसेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिथापीने म्हणजेच जणु एखाद्या फिल्मी स्टाईलपद्धतीने जेरबंद केले. कापसेला न्यायालयात हजर केले असताना त्याला दि. 28 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अंधारीच्या संजय शेलार खून प्रकरणात जलसागर हॉटेलचा मालक अरुण कापसे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र कोट्याधीश असलेल्या आरोपीला लपवण्याचे अनेक प्रकार झाले. खून प्रकरणात अटक झाली असताना सुद्धा न्यायालयाने तांत्रिक कारणावर त्याची सुटका केल्याने अनेकांनी छाती बडवली. दरम्यान, मेढा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यापुढे अरुण कापसेला जेरबंद करण्याचे दिव्य बनले होते.
कापसेने 10-10 किलोमीटरवर बदलल्या गाड्या
करोडोचा मालक असलेल्या कापसेने पलायन करताना प्रत्येक दहा किलोमीटरवर गाड्या बदलल्या. तसेच पोलिसांना मागमूस लागू नये म्हणुन बहाद्दराने मोबाईलसुद्धा घरी ठेवला.
फास्टटॅगने दिला इशारा
अरुण कापसे कोणत्या बाजूला गेला असेल याचा तपास करताना कोणतेच मोबाईल लोकेशन नव्हते. मात्र कापसे गेलेल्याच्या गाडीने आनेवाडी टोलनाक्यावर टोल दिला. या फास्टटॅगवरुन पोलिसांनी मोबाईल नंबर आणि त्याचे लोकेशन काढले. ते अपेक्षेप्रमाणे मिरजचे निघाले. आणि हेच सूत्र धरुन पुढील तपास सुरू झाला.
दरम्यान, अरुण कापसेला जेरबंद करत असताना सातारा पोलिसांनी यावेळी पूर्ण सतर्कता बाळगली आहे. न्यायालयीन त्रुटींचा आधार घेत सुटका झालेल्या अरुण कापसेला आणि त्याला सहकार्य करणाऱ्या, त्याचबरोबर आश्रय देणाऱ्या या दोघांनाही जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेचे जितेंद्र शहाणे यांच्यासह मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे करत आहेत.
लोकांना खोली मिळवून देणारा अरुण होता खोलीबंद
नामवंत हॉटेल आणि कित्येक रुमचे रिसॉर्ट देणारा अरुण कापसे अंधारी खून प्रकरणानंतर मिरजेतील एका फ्लॅटमध्ये जेरबंद होता. या फ्लॅटलाही बाहेरून कुलुप असायचे.