Gokul Election : Arun Dongle यांनी अखेर दिला गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा
आता गोकुळचा नवा अध्यक्ष कोण ? याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून कोल्हापुरातील गोकुळ दूध संस्थेत राजकीय नाराजीनाट्य पहायला मिळाले. याकाळात गोकुळमध्ये अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पदाचा राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे गोकुळचं राजकारण तापलं होतं.
दरम्यान, आता मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं आता गोकुळचा नवा अध्यक्ष कोण याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. माध्यमांशी बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केले होते. परंतु आज हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
डोंगळेंच्या भूमिकेनंतर सहकारात राजकारण नको, अशी भूमिका गोकुळच्या संचालकांनी घेतली होती. संस्थेत महायुती किंवा महाविकास आघाडी पॅनेल नसून येथे राजर्षी शाहू पॅनेल असल्याचं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. सहकार संस्थेत पक्षीय राजकारण नको, या भूमिकेवर संचालक ठाम राहिल्याने अरुण डोंगळे यांच्यापुढं गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे.
काय म्हणाले होते पाटील आणि मुश्रीफ?
याबाबत हसन मुश्रीफ म्हणाल होते, गोकुळची निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवली नव्हती. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात शाहू विकास आघाडी म्हणून लढवली होती. नव्या अध्यक्षाचं नाव अरुण डोंगळे यांना कळविले आहे. तर गोकुळच्या अध्यक्षपदाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार 15 मे रोजी अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, ते लवकरच राजीनामा देतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता.