कलाकार-साहित्यिकांना भत्ता वेळेतच
मंत्री तंगडगी यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : राज्यातील कलाकार व साहित्यिकांचा मासिक भत्ता वेळोवेळी देण्यात येत आहे, अशी माहिती कन्नड व सांस्कृतिक खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी यांनी बुधवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तर तासात भाजपचे आमदार डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली आहे. कन्नड व सांस्कृतिक खात्याकडून सध्या 11 हजार 154 कलाकार व साहित्यिकांना दरमहा 2 हजार 500 रुपये मासिक भत्ता देण्यात येत आहे. मासिक भत्ता घेणाऱ्या कलाकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीला 500 रुपये भत्ता सुरू करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंतचे भत्ते देण्यात आले आहेत, असे शिवराज तंगडगी यांनी सांगितले. मासिक भत्त्यासाठी नव्याने 1 हजार 896 साहित्यिक व कलाकारांनी अर्ज सादर केले आहेत. हे अर्जही स्वीकृत करण्यात आले असून त्यांनाही यापुढे दरमहा 2 हजार 500 रुपये भत्ता सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जानपद कार्यक्रम आयोजनाची मागणी
याच चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी जानपद कार्यक्रम सुरू ठेवण्याची मागणी केली. यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात जानपद कार्यक्रम करण्यात येत होते. अशा कार्यक्रमांमुळे कलाकारांना अनुकूल होत होते. आता असे कार्यक्रम थांबले आहेत. ते पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.
विजापूरसह अनेक ठिकाणी जानपद कार्यक्रम
त्यावर उत्तर देताना मंत्री शिवराज तंगडगी म्हणाले, जनपद कार्यक्रम थांबवण्यात आले नाहीत. म्हैसूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. चित्रदुर्ग येथे महिला कलाकारांसाठी कार्यक्रम होणार आहे. विजापूर येथेही कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.