Kagal News : अवकाळीची संततधार, कागलचा कृत्रिम धबधबा नैसर्गिकरित्या प्रवाहित
कागलचा हा निसर्गरम्य धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी खास आकर्षण
कागल : कागल नगरपालिकेने विविध शासकीय योजनेतून पाझर तलावाच्या सुशोभीकरणासोबत कृत्रिम धबधबा तयार केला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यंदा मे महिन्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे येथील पाझर तलावावर सुरू असलेला कृत्रिम धबधबा नैसर्गिक रित्या प्रवाहित झाला असून आकर्षणाचे केंद्र बनला आहे. रोज शेकडो लोक धबधब्याला भेट देत असतात.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून कागल नगर परिषदेने पर्यटनाच्या दृष्टीने शहरातील पाझर तलाव विकसित केला आहे. हद्दवाढ क्षेत्रातील नागरी सुविधांविषयी कामांना अर्थसहाय्य योजनेतून पालिकेने पाझर तलावाचे सुशोभीकरण केले. स्वर्गीय व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्रही विकसित केले. तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम धबधबा तयार केला. कालव्याच्या सांडव्याची रुंदी ८२ ते ८३ फूट आहे. यामध्ये दहा-दहा फूट रुंदीचे धबधबे तयार करण्यात आले आहेत.
या धबधब्याची उंची सुमारे २५ फूट आहे. यातील एक धबधबा केवळ महिलांसाठी तयार करण्यात आला आहे. तर इतर दोन धबधबे सर्वांसाठी खुले आहेत. लोणावळा येथील बुशी डॅमच्या धरतीवर नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचा वापर करून सुरक्षित धबधबे तयार केले आहेत. नेहमी हा धबधबा कृत्रिमरित्या सुरू असतो. आता मात्र मे महिन्यात सुरु असलेल्या पावसामुळे हा धबधबा नैसर्गिकरित्या प्रवाहित झाला आहे.
पाझर तलाव (मिनी गोवा) उन्हाळ्यातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण बनले आहे. याठिकाणी म्युजिकल फौंटन आणि लेसर शो, व्हॉईस फौंटन, नैसर्गिक पाण्यावर १२ महिने सुरु असणारा कृत्रिम धबधबा, गोव्यामध्ये उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे बोटिंग, स्वच्छ व निसर्गरम्य पदचारी मार्ग व गोवा बीच, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे अॅडव्हेंचर गेम्स, देशी वृक्ष लागवड, नैसर्गिक व महाराष्ट्रीयन पक्षांना आकर्षण करतील अशी ३६०० झाडांचे ऑक्सिजन पार्क आहे.
याशिवाय संपूर्ण प्रकल्प सोलर नेट मिटरींगवर, आकर्षक लाईट व पदचारी मार्गावर संगीत, प्रशस्त पार्किंग, कृत्रिम धबधबा व बोट क्लब, महिला व पुरुषांना स्वतंत्र चेजिंग रुमची सोय, पाण्याचे योग्य नियोजन व वापर, धबधब्यामधून पडणारे पाणी पुढे ओढ्यामध्ये विहीर मारुन पुन्हा तलावाच्या आतील बाजुस पाणी सोडले जाते. तलावाचे प्रदुषण होवू नये यासाठी सर्व प्रकारच्या सांडपाण्याकरीता ईटीपी प्लांट बसविला आहे. कार्यक्रम घेण्यासाठी लॉन व राहण्यासाठी उत्तम सोय आहे. तसेच या तलावात बोटिंगही सुरु करण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आनंद देणार आहे.
"भविष्यामध्ये येथे कृत्रिम कासव धबधबा बसवण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ४० बाय ६० फुट व उंचीला २५ फुट कासव धबधबा, तसेच कासवाच्या पोटातून रेनडान्सची सोय करण्यात येणार आहे. यामध्ये म्युजिक सिस्टिम व लाईट इफेक्ट असणार आहेत. छोट्या स्वरुपाचा वॉटर पार्क व सुंदर रिसॉर्ट उभारण्याचे नियोजन असून महाराष्ट्रातील व परराज्यातील पर्यटकांना मुख्य आकर्षण ठरेल असे नियोजन कागल नगरपरिषदेच्या सहकार्याने करण्याचा मानस आहे."
- प्रविण काळबर, माजी उपनगराध्यक्ष