आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचलित सीसीटीव्ही व्यवहार्य आहे का? विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांचा लक्षवेधी
नियमावली बनवत असल्याचे गृहमंत्र्यांनी केले स्पष्ट
कोल्हापूर प्रतिनिधी
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाविषयी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठी निर्देश संबंधितांना देण्यात आले असून त्याची नियमावली बनवत असल्याचे सांगितले. तसेच त्रयस्थ व्यक्तीस दिलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचा गैरवापर झाल्यास तो गोपनीयतेचा भंग समजण्यात येईल, असे ही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान आमदार सतेज पाटील यांनी पुण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का? अशी विचारणा केली. तसेच सी.सी.टी.व्ही. फुटेजचा त्रयस्थ व्यक्तीमार्फत होणारे गैरवापर टाळण्यासाठी उपायोजना आवश्यक असून सध्या उपलब्ध असणारी यंत्रणा व मनुष्यबळ पाहता अशा प्रकारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे लक्ष ठेवणे शक्य होईल का? त्याऐवजी कायद्यात बदल करून मोठी दंडात्मक कारवाई करता येईल का? या हिट अँड रन प्रकरणांत उच्च न्यायालयात आरोपीला मंजूर झालेल्या जामीन विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे का? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एस.एल.पी. फाईल करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणीस सुरुवात होईल.असे सांगितले खासगी आस्थापनांमधील सी.सी.टी.व्ही. फुटेजचा गैरवापर टाळयासाठी निर्देश संबंधितांना देण्यात आले असून त्याची नियमावली बनवत आहोत. तसेच त्रयस्थ व्यक्तीस दिलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचा गैरवापर झाल्यास तो गोपनीयतेचा भंग समजण्यात येईल असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.