For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृत्रिम बुद्धिमत्तेला मानसिकतेची जोड आवश्यक

06:50 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
कृत्रिम बुद्धिमत्तेला मानसिकतेची जोड आवश्यक
Advertisement

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि महात्म्य आता सर्वमान्य झाले आहे. व्यक्तीपासून व्यवसायाला पूरक व प्रेरक अशा या कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित प्रवास-प्रक्रियेमध्ये मानवीय पैलूंचे महत्त्व सुद्धा महत्त्वाचे राहणार आहे. उद्योग-व्यवसायात धोरणात्मक निर्णय, समस्यांची सोडवणूक, संवादक्षमता, व्यावहारिक लवचिकता व मुख्य म्हणजे स्वत:सह सर्वांना समजून घेण्याची क्षमता या बाबी सारख्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

Advertisement

आज उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी विषयामध्ये महत्त्वाचे बदल झालेले वा होणारे दिसतात. परिणामी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोडीलाच विज्ञान-तंत्रज्ञान यावर आधारित प्रक्रिया, संगणकीय पद्धती व विश्लेषण इ. मध्ये मोठे बदल वेगाने घडत आहेत. पूर्वी वा परंपरागतरित्या मानवीय प्रयत्नांतून हाताळले जाणारे काम आता अद्ययावत व यांत्रिकी पद्धतीने हाताळले जात आहे. त्यानुरुप कंपनीचे कामकाज व कर्मचाऱ्यांचे काम या उभयस्तरांवर बदल होत आहेत. याचेच परिणाम कामाची अपेक्षा व आवश्यकता या महत्त्वपूर्ण घटकांवर होत आहेत. परिणामी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मात्र त्याचवेळी आधुनिक व प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाला विविध मानवीय पैलूंची जोड मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दांमध्येच प्रगत तंत्रज्ञान व मानवीय माध्यमातून साकारली जाणारी मानवी म्हणजेच कर्मचाऱ्यांची आकलन- अनुसरणाशी निगडित या दोन्ही परस्परपूरक प्रक्रियांचा समावेश झालेला दिसतो. परिणामी विकसित तंत्रज्ञान व प्रगल्भ मानसिकता या दोन्हीचा समन्वय यामध्ये अपेक्षित आहे. संगणकीय व प्रगत कार्यपद्धती, तंत्रज्ञानावर आधारित कार्यशैलीचा अवलंब व नव्या संशोधनाची वेळेत व यशस्वीपणे अंमलबजावणी या गुणविशेषांचा कर्मचाऱ्यांमध्ये विकास करण्यावर प्रमुख कंपन्यांनी सुरुवात केली आहे. त्यातही मुख्य भर दिला जातो तो कामकाजातील समस्यांची सोडवणूक करतांनाच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व त्याद्वारे वाढत्या व्यावसायिक विकासावर. यामध्ये कर्मचारी व कंपनी या उभयतांची प्रगती यावर भर पडू शकते.

Advertisement

कर्मचाऱ्यांना केवळ कार्यक्षमच नव्हे तर भविष्यकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करणे हे मोठे आव्हानपर व तेवढेच अनिवार्य काम ही बाब ‘एआय’च्या अंमलबजावणीची पार्श्वभूमी तयार करते. याचाच परिणाम कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व अधिक मोठ्या जबाबदारीसह काम करण्याची क्षमता, नवीन प्रकारचे व प्रगत पद्धती व तंत्रज्ञानावर आधारित काम करण्याची तयारी, व्यवस्थापनाला आवश्यक अशा नव्या व वाढत्या गरजांसह काम करण्यासाठी आवश्यक असे पूर्व प्रशिक्षण, या साऱ्या प्रक्रियेशी निगडित बदलांशी जुळवून घेण्याची मानसिकता इ. बाबी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविल्या जाणे सहज शक्य होते. या साऱ्या प्रयत्न प्रशिक्षणाचे फायदे वैयक्तिक स्तरावर संबंधित कर्मचाऱ्यांना व व्यवस्थापन स्तरावर कंपन्यांना होत असतात, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

याचाच परिणाम म्हणून आज विविध व्यवस्थापन कंपन्यांमध्ये एआय वा तत्सम प्रणालीमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड वा पदोन्नतीसाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये उद्योग विश्वाचे बदलते स्वरुप व काम याच्याशी शैक्षणिक तंत्रज्ञान विषयकच नव्हे तर बौद्धिक भावनात्मक स्वरुपात सांगड घालणाऱ्या व्यक्ती अधिकाधिक यश प्राप्त करू शकतात, हे अनेकार्थानी सिद्ध झाले आहे. त्यामुळेच व्यवसाय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रभाव वाढत्या प्रमाणात होत आहे. आज तर शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्येच अशा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, व्यावसायिक, व्यवस्थापनपर अभ्यासाला प्रज्ञाशीलतेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिल्यास असे विद्यार्थी भविष्यात अधिक प्रभावीपणे करिअर करून आपला विकास साधू शकतात, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. तंत्रज्ञान व एआय यांचा संयुक्त समन्वय साधणारे भविष्यात आपापल्या क्षेत्रात काम करतांना परस्पर समन्वय, संबंध, निर्णयक्षमता, नेतृत्वशैली, संवाद व समस्यांची सोडवणूक, सातत्यपूर्ण प्रयत्नशीलता इ. क्षेत्रात निश्चितपणे आपला प्रभाव पाडू शकतात.

आज व्यवस्थापक-व्यवस्थापन या उभय क्षेत्रांमध्ये संवादासह विश्लेषणपर प्रवृत्तीचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. याचा उपयोग वैयक्तिकच नव्हे तर संस्थागत स्तरावर सहजपणे केला जाऊ शकतो, हे करताना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनापासून आर्थिक-व्यावसायिक मार्केटिंग वा प्रकल्प व्यवस्थापन या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा यथोचित वापर सुरु झाला असून त्याचे फायदे दिसू लागले आहेत. विशेषत: मोठ्या वा विस्तृत स्वरुपातील मजकूर व त्याचे संकलन आणि मांडणी, रचना, आखणी व त्याची नेमकी प्रस्तुती करणे, आपल्या मुद्दे वा विचारांना अद्ययावत संदर्भांसह अद्ययावततेची साथ देणे, माहितीचे कमीत कमी वेळात विविध संदर्भांसह संकलन करणे, त्याला विश्लेषणासह सादर करणे इ. ‘एआय’ चे बहुआयामी उपयोग होत असतात.

तंत्रज्ञानाच्या कक्षा विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान वा संगणकीय पद्धतीपलीकडे विस्तारित होत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या अद्ययावत व विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम व त्याचा प्रसार आणि वापर इ. ची मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. साचेबद्ध शैक्षणिक अभ्यासक्रमाची चाकोरी मोठ्या प्रमाणात बदलली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराद्वारे करिअरची सुरुवातच नव्हे तर त्यामध्ये प्रगती करताना आज तंत्रज्ञानाला संवाद कौशल्य व आर्थिक व्यवहार क्षमतेची, संशोधनाला संवादक्षमतेची, मार्केटिंगला मानवीय पैलूंची आणि मानव संशाधन क्षेत्राला संगणक तंत्रज्ञानाची पुरेशी जोड मिळणे अपरिहार्य ठरले आहे. नेमके हेच काम अधिक सुलभ, अचूक व प्रभावीपणे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि व्यवहार आवश्यक ठरला आहे. या सर्व व्यवस्थापकीय क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच व्यावहारिक व व्यावसायिक यशासाठी मानवी स्वभाव व पैलू यांच्याशी निगडित मानसिकता मात्र अनिवार्य ठरली असून त्याचेच प्रत्यंतर दिसून येत आहे.

संस्थागत स्तरावर एआयचा वापर वाढत्या प्रमाणावर होत असतांनाच त्याला व्यक्तिगत स्तरावर विज्ञान तंत्रज्ञानाच्या अद्ययावततेच्या जोडीलाच विविध प्रकारच्या  मानवीय मूल्याधारित अशी व्यावसायिक मूल्ये, प्रज्ञाशील कार्यपद्धती, आगामी वा प्रस्तावित व्यवस्थापकीय व व्यवस्थापनपर पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तयार करण्यावर भर देत असून यातूनच एक नवे शैक्षणिक व्यावसायिक वातावरण तयार होत आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.