कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केले रोजगार संकट
कृत्रिम बुद्धिमता अर्थात, एआयचा परिणाम भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि इतर संलग्न क्षेत्रावर कसा होत जाईल, याबाबत अनेक तर्क व भाकिते गेल्या दशकभरात करण्यात आली आहेत. त्यातील सत्यता वस्तुस्थितीच्या आधारावर पूर्णत: सिद्ध होण्यास अद्याप अवकाश आहे. सर्वात तातडीचा मुद्दा आहे तो म्हणजे, एआयच्या आगमनामुळे मानवी रोजगारावर कोणता परिणाम होणार आहे? जागतिक आर्थिक मंचाने असा अंदाज वर्तवला आहे की, 2026 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता सुमारे 85 दशलक्ष नोकऱ्यांची जागा घेईल.
प्राइस वॉटरहाऊस कूपर्स या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या व्यावसायिक सेवा पुरवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत सुमारे 30 टक्के नोकऱ्या स्वयंचलित होऊ शकतात. स्वयंचलित वाहने आणि इतर यंत्रे अनेक शारीरिक कामांची जागा घेतील. विशेषत: जिथे पुरुष रोजगाराचा वाटा अधिक आहे, तिथे जास्त परिणाम दिसून येईल. त्या आधीच्या टप्प्यात महिलांचा सहभाग अधिक असलेल्या लिपिक आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये स्वयंचलनाचा अंतर्भाव होऊन रोजगार घटेल. या पार्श्वभूमीवर एआयचा वापर करणाऱ्या काही महत्त्वपूर्ण देशांमध्ये सद्यस्थिती काय आहे यावरून भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थोडाफार अंदाज येऊ शकतो.
जुलैमध्ये शांघाय येथील जागतिक एआय परिषदेला संबोधित करताना चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग म्हणाले की, एआय हे सामायिक समृद्धी आणि सामायिक सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे प्रेरक घटक असले पाहिजे. तथापि, चीन स्वत: हे उद्दिष्ट, एका अधिकाधिक अनिश्चित होत चाललेल्या कामगार बाजाराच्या दिशेने जात साधताना दिसतो. चीन पाश्चात्य देशांमध्ये कधीही न दिसलेल्या प्रमाणात एआयच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. चार महिन्यांपूर्वी ‘अपोलो गो’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चालकविरहित टॅक्सींच्या ताफ्यातील अनेक गाड्या वुहान शहराच्या रस्त्यांवर अचानक थांबल्या. एआय प्रणालीतील बिघाडामुळे त्रस्त प्रवासी तासनतास अडकून पडले. त्यानंतर या रोबोटॅक्सींना चौकशीसाठी अनेक महिने वुहानच्या रस्त्यांवरून हटवण्यात आले. मात्र हा व्यत्यय रोजगार घटलेल्या काही मानवी टॅक्सी चालकांसाठी वरदान ठरला. ग्राहक परत आल्याने त्यांचे उत्पन्न वाढले. अपोलो गो प्रकरणामुळे चीनमधील वाढत्या अस्थिर कामगार बाजारात, प्रचंड वेगाने येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाने निर्माण झालेला तणाव अधोरेखित झाला. उच्च बेरोजगारीच्या पातळीने त्रस्त असण्यासोबत, चीनमध्ये लाखो कामगारांनी औपचारिक रोजगार सोडून, अलिखित व अल्पकालीन गिग इकॉनॉमीमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. निरिक्षकांच्या मते, अशा लवचिक रोजगारात असलेल्या लोकांची संख्या 2019 मधील 160 दशलक्षावरून या वर्षाअखेरपर्यंत 320 दशलक्ष इतकी होईल. ही संख्या चीनच्या एकूण कामगार वर्गाच्या 44 टक्के आहे. टॅक्सी चालक या मोठ्या गटाचाच एक भाग आहेत.
चीनमध्ये रिअल इस्टेट आणि शिक्षण यासारखे मोठे रोजगार क्षेत्र अलिकडे कमजोर झाल्याने, कामगारांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, मोबाईलद्वारे गाडी ठरवण्याची सुविधा असलेल्या अॅप्सचा आधार घेत उपजीविका शोधल्या. पण आता रोबोटॅक्सीच्या आगमनामुळे त्यांच्या उपजीविकेस धोका निर्माण झाला आहे. रोबोटॅक्सी हा चीनमधील सर्वात लोकप्रिय एआय अनुप्रयोगांपैकी एक आहे. सरकारने तो राबवताना या क्षेत्रातील मानवी रोजगाराचा फारसा विचार न केल्याने टॅक्सी चालकात सार्वत्रिक नाराजीचे वातावरण आहे. याचप्रमाणे चीनची राजधानी बिजिंगमध्ये काम करणारे छायाचित्रकार एआय सॉफ्टवेअरने त्यांची जागा घेतल्याने अडचणीत आले आहेत. चित्रपटसृष्टीत एआयचा वापर जसजसा वाढत आहे, तसतसे या क्षेत्रातील अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे. नव्याने येणारा, एक पूर्ण लांबीचा चित्रपट पेलण्याची क्षमता असलेला, डिजीटल क्लोन तर अनेकांची झोप उडवणारा ठरला आहे. अशा रितीने चीनमधील ‘गिग’ कामगार त्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या एआयच्या परिणामांबाबत भयभीत आहेत, तर दुसरीकडे एआयने उच्च श्रेणी कामगारांच्या जागा घेतल्याच्या अलीकडील घटनांमुळे कामगारांनी हे तंत्रज्ञान स्वीकारावे की, त्याच्याशी स्पर्धा करावी, यावरही एक वादविवाद सुरु झाल्याचे दिसते. प्राप्त एआय आणीबाणीच्या स्थितीत अनेक विश्लेषकांना असे वाटते की, चीनमध्ये सरकारचे खासगी क्षेत्रावर लक्षणीय नियंत्रण असल्याने एआय संबंधित रोजगार कपातीचे परिणाम रोखण्यासाठी हा देश अमेरिकेपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असेल.
अमेरिकेतील परिणाम
‘एआय तुमच्या नोकरीवर नाही, तर तुमच्या पगारावर येत आहे,’ अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटच्या संशोधनाचा हा निष्कर्ष आहे, ज्यात अमेरिकेतील विविध नोकऱ्यांमध्ये एआय स्वीकारल्यामुळे वेतन आणि रोजगारावर होणाऱ्या परिणामांचे मोजमाप करण्यात आले आहे. 321 व्यवसायांमधील वेतन आणि रोजगाराच्या माहितीचा अभ्यास करणाऱ्या, या ताज्या शोध निबंधात असे आढळून आले की, 2023 नंतर, म्हणजेच ज्या काळात चॅट जीपीटी पहिल्यांदा सार्वत्रिक झाले, त्यानंतर एआयशी सर्वाधिक संबंध असलेल्या नोकऱ्यांच्या वास्तविक वेतनवाढीत सरासरी 6.7 टक्क्यांनी घट झाली. तरीही एकूण रोजगारावर एआयचा परिणाम लक्षणीय नव्हता, असे अपोलोच्या विश्लेषक व अर्थतज्ञांनी म्हटले आहे.
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, एआय तुमची नोकरी हिरावून घेणार नाही, पण त्यामुळे तुमची पगारवाढ कमी होऊ शकते. एआयने सर्वात कमी उत्पन्न असलेल्यांच्या वेतनवाढीवर सर्वाधिक परिणाम केला, असे या संशोधन अहवालातून स्पष्ट होते. 2023 पासून सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमाईच्या वाढीत सरासरी 24 टक्क्यांनी घट झाली, तर सर्वात कमी उत्पन्न असलेल्या 25टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्याच कालावधीत 11 टक्क्यांनी घट झाली. विशेष म्हणजे, सर्वाधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही लक्षणीय परिणाम दिसला नाही, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील सुमारे 58 लाख कामगारांचे काम, एआयशी मोठ्या प्रमाणात संबंधित आहे. कार्पोरेट अमेरिका एआयचा अवलंब जसजसा वाढवत जाईल तसे संबंधित क्षेत्रातील वेतन लक्षणीयरित्या घटत जाईल, त्याचे येत्या काही वर्षात, उत्पन्न समानतेवर आणि श्रम बाजार धोरणावर, महत्त्वपूर्ण परिणाम होतील, असे भाकीत सदर संशोधनाने केले आहे. इतर काही तज्ञांनी अमेरिकेतील वेतन घटीचा वाढता कल एआयच्या वाढत्या वापरानुसार अंतिमत: बेरोजगारीत बदलून जाण्याचा इशारा दिला आहे.
ब्रिटनमधील परिस्थिती
ब्रिटनमधून प्रसिद्धीस आलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील नोकऱ्या निर्माण करणारे व्यावसायिक एआय कौशल्य असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करत आहेत आणि इतरत्र कपात करत आहेत. एआय तंत्रज्ञान कसे दुहेरी बाजारपेठ निर्माण करू लागले आहे, ते ही आकडेवारी दर्शवते.
जॉब सर्च वेबसाईट ‘इंडीड’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटिश कंपन्यांनी या महिन्यात 2025 च्या तुलनेत सुमारे 10 टक्के कमी रिक्त जागा जाहीर केल्या. ब्रिटनमधील श्रम बाजारपेठ दोन गतींमध्ये अधिकाधिक विभागली जात आहे, असे इंडीडचे वरिष्ठ अर्थतज्ञ म्हणतात. कामगार मागणी संपूर्ण व्यवसायात समान रीतीने पसरण्याऐवजी, ती अनुभवी कामगार आणि थेट एआयशी संबंधित पदांवर केंद्रीत होत आहे. नोकरी निर्माणाचा कल विशिष्ट तांत्रिक कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडे अधिक असल्याने, ब्रिटनमध्ये नोकरी बदलू पाहणाऱ्या, पहिली नोकरी मिळवू पाहणाऱ्या, अनेकांच्या आवाक्याबाहेरचे स्वरुप श्रम बाजारपेठ धारण करत आहे. खर्च कमी करण्यासाठी व उत्पादकता वाढवण्यासाठी कंपन्या एआयचा वापर करत असल्याने हे चित्र निर्माण झाले आहे.
अनिल आजगांवकर