‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आव्हान नसून एक संधी- डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचा कार्यक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुध्दीमता) चा जगभरात बोलबाला सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान अद्याप बालावस्थेत आहे, असे म्हणावे लागेल. प्रगत देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरली जात आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशात आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे तंत्र, पूर्णं क्षमतेने पोहोचण्यासाठी कांही अवधी लागणार आहे. या तंत्रज्ञानामुळे रोजगारावर गदा येईल, ही भीती अनाठायी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आव्हान नसून, चालून आलेली संधी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. कोल्हापूरच्या नवोदितांना अनेक नव-नवीन संधी उपलब्ध असून, त्यांनी याचा फायदा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने येथे आयोजित कार्यंक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सयाजीमधील व्हिक्टोरिया हॉलमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रम त्यांनी ‘भविष्यातील कोल्हापूरचा व्यापार व उद्योग’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, सागर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. माशेलकर यांनी व्याख्यानात प्रथम जगाचा, देशाचा, राज्याचा व कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. शास्त्रज्ञ व उद्योग यांचे नाते जवळचे आहे. त्यामुळेच उद्योगाला चालना मिळत असते. त्यामुळे परदेशात युवकांना ब्रँडेडची संधी मिळत असते. पण आपल्या देशात ही संधी मिळत नसल्याने, भारतातील तरूण परदेशात जाऊ लागले होते. पण आता हे चित्र बदलू लागले आहे. यासाठी तरूणांना संधी मिळणे गरजेचे आहे. संधी मिळाल्यास कोल्हापूरातील नवोदीत या संधीचे सोने करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवोदितांनी, डिजिटलचा ध्यास धरावा
कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखाने, वस्त्रोद्योग व फौंड्री उद्योगाने व्यापला आहे. आपली निर्यात वाढून उत्पन्न वाढावे, यासाठी येथील उद्योगांनी आपला पारंपरिक व्यवसाय बदलून, नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. त्यामुळे आपली, जिल्हाची व राज्याची प्रगती होऊन देशाचा विकास होईल. सर्व क्षेत्रात स्पर्धा सुरू असून, विशेषत: नवोदितांनी, फिजिकलमध्ये न अडकता डिजिटलचा ध्यास धरावा. आपल्या ज्ञानाचा, डोक्याचा वापर करून, तंत्रज्ञानावर नेहमी फोकस ठेवा. संधी कधीही येऊ शकते. या संधीचे दार उघडण्यासाठी नेहमी सज्ज राहण्याची गरज आहे. कोल्हापूरच्या नवोदित युवकामध्ये कौशल्य, कष्टाची तयारी असल्याने या संधीचा फायदा घ्या, असा मोलाचा सल्ला डॉ. माशेलकर यांनी दिला.
यापूर्वी आयातीसाठी देशाला इतर देशापुढे हात पसरावे लागत होते. पण आता हे चित्र बदलले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. आज 233 देशात भारत 156 व्या क्रमांकावर होता, तो आता मोबाईल क्षेत्रात जगाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. हे फक्त तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे भारताची वाटचाल प्र्रगतीकडे सुरू आहे. स्टार्टअपमुळे महाराष्ट्रातही अनेक संधी उपलब्ध होऊन निर्यातीची संधीही मिळाली आहे, याची कांही उदाहरणे त्यांनी दिली.
कोल्हापूर ब्रॅंडेड होणार : आमदार सतेज पाटील
कोल्हापूरची वाटचाल सर्वं क्षेत्रात सुरू असून, जिल्हा आघाडीवर आहे. पण याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आता कोल्हापूरसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कोल्हापूरची विमानसेवा आता कनेक्टीव्ह झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 90 लाख स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असून, 2030 मध्ये नवे कोल्हापूर उभे राहणार आहे. मिरजेला मागे टाकून आज कोल्हापूरच्या आरोग्य क्षेत्राची वाटचाल, मल्टी हॉस्पिटलबरोबर मेडिकल टुरिझमकडे सुरू आहे. कोल्हापुरात आयटी पार्क उभारणीचा प्रयत्न सुरू आहे. फौंड्री क्लस्टरमुळे जगातील कोणत्याही वाहनाचा पार्ट कोल्हापुरातच बनवला जात आहे. त्यामुळे कोल्हापूरची वाटचाल ब्रॅंडेडकडे सुरू असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
सागर देशपांडे यांनी प्रास्तविकात कोल्हापूरच्या यशोगाथेचा आढावा घेतला. तर ए.के. गुप्त यांनी डॉ. माशेलकर यांचा परीचय करून दिला. आमदार ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. यावेळी औद्योगिक संघटना, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर प्रश्नोतरे होऊन, त्यांच्या शंकांचे निरसन डॉ. माशेलकर यांनी केले.